विविध विकास कामांच्या २२ कोटी ४९ लाख रुपये खर्चास स्थायी समितीची मंजुरी

0
200

पिंपरी, दि. २२ (पीसीबी)  :- महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या सुमारे २२  कोटी ४९  लाख रुपये खर्चास आज स्थायी समितीने मान्यता दिली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

            पीएमपीएमएलला माहे डिसेंबर २०२१ करीता सुमारे  १२ कोटी रुपये दिले जाणार आहे. या विषयास  आज  बैठकीत मान्यता देण्यात आली.  प्रभाग क्र.२६ वाकड  पिंपळे निलख रोड लगतच्या  जागेमध्ये लिनीअर गार्डन विकसित करण्यात  येणार आहे. यासाठी ७२ लाख रुपये खर्च होतील. लक्ष्मीबाई बारणे उद्यानाचे नुतनीकरण करण्यासाठी ५८ लाख रुपये, प्रभाग क्र.१४ मधील काळभोरनगर चिंचवड स्टेशन व इतर परिसरातील पेव्हींग ब्लॉक आणि  स्ट्रॉर्म वॉटर लाईनची दुरुस्तीची कामे करण्याकरिता ३० लाख रुपये, प्रभाग क्र.१० मध्ये नविन कलर पेव्हींग ब्लॉक बसविणे, फुटपाथ  करणे व दुभाजक बसविणे व इतर अनुषंगिक कामे करण्याकरिता ४१ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्र. १२ मधील त्रिवेणीनगर चौक ते तळवडे चौक मुख्य रस्त्याच्या  बाजुस फुटपाथ दुरुस्ती करून आवश्यकतेनुसार नवीन फुटपाथ करण्याकरिता १९ लाख रुपये, प्रभाग क्र.६ मध्ये चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर, लांडगेवस्ती व परिसरात  किरकोळ दुरुस्ती व देखभालीची  कामे करण्याकरिता ३२ लाख रुपये, प्रभाग क्र.६ मध्ये भगतवस्ती, गुळवे वस्ती, धावडे वस्ती, सद्गुरूनगर, लांडगेवस्ती, चक्रपाणी, वसाहत परिसरात खड्डे व चरांची डांबरीकरणाने दुरुस्ती करण्याकरिता ६६  लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्र.१२, रूपीनगर येथील एकता चौक ते रामेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता दुरुस्त करून डांबरीकरण करण्याकरिता २८ लाख रुपये, प्रभाग क्र.१२, तळवडे येथील लक्ष्मीनगर, कॅनबे चौक परिसरातील अंतर्गत रस्ते डांबरीकरण  करण्याकरिता ३२ लाख रुपये, वाल्हेकरवाडी  भागातील रस्त्यांची दुरुस्ती हॉटमिक्स  पद्धतीने करण्याकरिता ३२ लाख रुपये तर प्रभाग क्र.८ येथील से क्र.१ वैष्णोदेवी शाळेसमोरील भूखंड ३ मध्ये अद्यावत बहुउद्देशीय हॉल व अनुषंगिक कामे करण्याकरिता एकूण ६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, या खर्चासही आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.