मोदी मुक्त भारतासाठी सभा घेणार – राज ठाकरे

0
458

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे, असे सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय आज (मंगळवार) येथे जाहीर केला. मोदी मुक्त भारतासाठी सभा घेणार आहे, असेही राज यांनी यावेळी  स्पष्ट केले. 

रंगशारदा सभागृहात राज ठाकरे यांनी मनसेचा मेळावा घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी ते म्हणाले की, मोदींच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र  येण्याबाबत मी  गेल्या गुढीपाडव्यालाच बोललो होतो. ही लोकसभा निवडणूक मोदी, शहा यांच्या विरोधात देश अशीच असणार आहे. माझ्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कोण? हे माझ्यासाठी महत्त्वाचे नाही. जे काही करायचे आहे, ते मोदी आणि भाजपाच्या विरोधात करायचे आहे, असेही आवाहन त्यांनी  मनसैनिकांना  केले.

लोकसभेची लढाई ही कोणत्याही विशिष्ट पक्षाशी नाही, तर मोदी आणि अमित शाह या दोघांच्या विरोधात आहे. त्यांच्या उमेदवारांना मत देऊ नका, असेही आवाहन राज ठाकरेंनी केले. पंतप्रधान  मोदी यांच्यावर मुळीच विश्वास ठेवू नका, असे आवाहन करून त्यांनी काही व्हिडिओ क्लिप्स दाखवून मोदींवर निशाणा साधला.