मुख्यमंत्री नव्हे शिवसैनिक, एकनाथराव शिंदे अंगार है… थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
345

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. या प्रसंगी त्यांनी केलेले सव्वातासाचे तडाखेबंद उत्स्फुर्त भाषण महाराष्ट्राने पाहिले. कधी नाही पाहिले ते शिंदेंचे रुप दिसले. हासू, आसू आणि कोपरखळ्यांनी ठासून भरलेले पहिलेच दणदणीत भाषण गाजले. बेंबीच्या देठापासून अगदी कळवळून मुख्यमंत्री नव्हे तर एक शिवसैनिक शिंदेंच्या रुपाने बोलला. मारुतीच्या मूर्तीला शेंदूर फासून फासून त्यावर खोळ चढते आणि मूळ मूर्ती दिसेनासी होते. अनेक वर्षांनी खरवडून ती खोळ काढली की सुंदर, सुबक मूर्ती नजरेस पडते आणि भक्तांना हायसे वाटते. अगदी तसेच झाले. एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून शिवसेनेचा मूळ चेहरा पुन्हा प्रगटला. शिवसेना म्हणजे जे पोटात तेच ओठात. शिंदेंचे भाषण तेच होते. दोन अडिच वर्षे दाबून ठेवलेली सगळी खदखद बाहेर आली. प्रपंचावर तुशळीपत्र ठेऊन संघटनेसाठी झोकून दिलेला एक हाडाचा शिवसैनिक उफाळून आलेला पाहिला. समाजसेवेसाठी रक्ताचे पाणी केले, दिवसाची रात्र केलेला सैनिक शिंदे यांच्यात दिसला. सिमा आंदोलनातील ४० दिवसांची कोठडी, कानडी पोलिसांचा मार, १६ लेडिज बार फोडल्याचा अभिमान, तेलासाठी आंदोलन, वीजेसाठी आंदोलन आणि १०० वर पोलिस केसेसे अंगावर घेणारे ठाण्याचे शिवसेना शाखा प्रमुख शिंदे. समांतर न्यायालय चालविणारे धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत घडलेला अस्सल बावनकशी शिवसैनिक या भाषणात दिसला. `आपण कालही शिवसैनिक होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार“, हा त्यांचा दृढ निश्चय, निर्धार तेच सांगतो. “आपल्या घरावर दगड फेकणारा अजून जन्माला यायचाय“, ही भाषा मुख्यमंत्री म्हणून अशोभनिय आहे, पण शिवसैनिकच ती बोलू शकतो.
क्षणभर वाटले, बाळासाहेब ठाकरे यांची भरकटलेली शिवसेना ताळ्यावर आणण्यासाठी शिंदे यांनी जे काही बंड म्हणा की उठाव केला ती आज काळाची गरजच होती. शिंदेंच्या भाषणातून ५६ वर्षापूर्वीची मूळ शिवसेना पुन्हा एकदा नव्या दमाने उभारी घेतेय, असे भासले. शिंदेंचा हा अवतार पाहून हे प्रकरण वाटते तितके सोपे नाही याचा अंदाज भाजपालाही आला असेल.

शिवसैनिकांचे अशी कोंडी झाली म्हणून…
आता खरी शिवसेना कोणती हा प्रश्न आहे. वारसाहक्काने आलेली उध्दव ठाकरे यांची शिवसेना हीच मूळच शिवसेना यात दुमत असण्याचे कारण नाही. `माझ्या उध्दवला सांभाळा`, हा बाळासाहेब ठाकरे यांचा शेवटचा संदेश आजही शिंदेंच्या ह्रदयात आहे. पण “काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर शिवसेनेचे वैचारीक सूत जमनार नाही, तसे झाले तर मी माझे दुकान बंद करेल“, हा ठाकरे यांनी दिलेला संदेश अधोरेखीत करायलासुध्दा शिंदे विसरले नाहीत. २०१२ नंतर म्हणजे शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना वाढली, फोफावली, पण गेल्या अडिच वर्षापूर्वीची महाआघाडी करण्याची घोडचूक आज महागात पडली हेच शिंदे यांनी काही दाखले देऊन सांगितले. शिवसेनाप्रमुख ज्या पध्दतीने हिंदू-मुस्लिम वर बोलायचे त्यात आता किती, कशी कोंडी होत होती, हे शिंदेंनी सोदाहरण दाखवून दिले. सावरकरांच्या विषयाला काँग्रेसचा विरोध म्हणून तिथे बालायचे नाही. संभाजीनगरचे नामांतर करायचे पण तिथेही आळीमिळी गूपचिळी. नवाब मलिक प्रकरणात दावूद संबंध पण राष्ट्रवादीची नाराजी नको म्हणून तिथेही कोंडी. ज्यांच्या तक्रारीमुळे म्हणजेच काँग्रेसमुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार सहा वर्षे गोठविण्यात आला. ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली होती, आता त्यांच्याच मांडिला मांडी लावून बसायचे. कायम हिंदुत्वाच्या मुद्याला विरोध करणाऱ्यांबरोबरच्या सत्तेसाठी तडजोडीचे राजकारण शिंदे आणि शिवसेनेच्या ४० आमदारांना पसंत पडले नाही. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करुन जिंकलेल्या बंडखोर ३५ सेना आमदारांना २०२४ च्या निवडणुकित आपले मरण दिसत होते. हे सगळे तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तब्बल पाच वेळा भेटून सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने हे महाभारत घडल्याची खंत शिंदे बोलून दाखवतात. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाला मोक्का लावून सतावल्याचा शिंदे यांनी दिलेला दाखलाच खूप बोलका होता. असे शेकडो शिवसैनिक खोट्या केसेसेमध्ये अडकवले गेले, पण त्यांना मदत झाली नाही. ज्यांना मोक्का लावला त्याला राष्ट्रवादीत आला तर सर्व माफ करण्याची ऑफर होती. महाआघाडीच्या सत्तेत शिवसैनिकांना काय मिळाले तर तडिपारी, मोक्का, जेल. असे असेल तर ती सत्ता काय कामाची. अशा परिस्थितीत मग शिवसेनेचा मुख्यमंत्री असून काय फायदा, हा शिवसैनिकांचा आणि शिंदे यांचाही रोकडा सवाल आहे. गाव, वाडिवस्तीमधील नव्हे तर पुणे, मुंबईच्या शिवसैनिकांच्या मनातील ती भावना होती व आहे. त्यात १०१ टक्का तथ्य आहे. राष्ट्रवादी बरोबर का नको वाटते याचा शिंदे यांनी केलेला युक्तीवाद बिनतोड होता. स्वतः उध्दव ठाकरे आणि सतत शरद पवार वा राष्ट्रवादीच्या बाजुने लंगडे समर्थन कऱणाऱ्या संजय राऊत यांचा शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला, तोसुध्दा भावला. एक-दोन नव्हे तर तब्बल ४० आमदार फुटतात तेव्हा, आपले कुठेतरी चुकते हे ठाकरे यांनी मान्य केले असते तर हे सत्तांतर कदाचित टळले असते. आता ठाकरे यांच्या शिवसेनेकडील १५ पैकी आणखी पाच-सहा आमदारसुध्दा आपल्याकडे यायच्या तयारी असल्याचा गौप्यस्फोट शिंदे यांनी केलाय. १९ पैकी १५ खासदार शिंदे यांच्या मताचे आहेत. आजा ना उद्या तेसुध्दा उठाव कऱण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या आहेत. तीन वेळा खासदार असलेल्या उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदेंचे अभिनंदन केले म्हणून त्यांची हकालपट्टी होते आणि पुन्हा निर्णय फिरवला जातो. माजी मंत्री विजयबापू शिवतारे पत्रकार परिषद घेऊन शिंदेंचे समर्थन करतात. एक एक शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख आता शिंदेंची भाषा बालू लागलाय. उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या दरबारी राजकारणाला ३५-४० वर्षे संघटनेत काम कऱणारे कंटाळलेत. शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे ४० आमदार हा त्याचाच परिपाक होता. उद्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांनासुध्दा शिंदेंची शिवसेना सत्तेतून सत्ता मिळवू शकते. अशा परिस्थितीत ठाकरेंची शिवसेना काय कऱणार हा प्रश्न आहे. शिंदेंच्या तडाखेबंद भाषणातून ठाकरे पितापुत्रांनी थोडेतरी आत्मपरिक्षण केले पाहिजे, अन्यथा कालांतराने शिंदेंचीच शिवसेना खरी ठरेल. आता शिवसैनिकांकडून निष्ठा व्यक्त करण्यासाठी चक्क प्रतिज्ञापत्र घेतले जाते, याचा शिंदे यांनी केलेला उल्लेख ठाकरेंची शिवसेना किती दुर्बल आहे ते सांगणारा आहे. आपल्याच कार्यकर्त्यांवर ठाकरे यांचा विश्वास नसल्याचे ते द्योतक आहे. संघटनेत किती अविश्वास आहे त्याचे हे लक्षण आहे. शिवसेना वाचविण्यासाठी ठाकरे सैरभैर झालेत, असे दिसते.

शरद पवार, अजित पवार आणि ठाकरे –
शिंदे यांच्या प्रमाणेच ३५ वर्षे शिवसेनेसाठी रक्त आटवलेल्या गुलाबराव पाटील यांचे भाषण हासुध्दा शिवसैनिकांचा आव्वाज होता. ठाकरे यांचे कुठे चुकले यावर पाटलांनी नेमके बोट ठेवले. वर्षवर्षे जेल भोगली, संघटनेसाठी आयुष्य वेचले पण नेत्यांना भेटायला मिळत नाही, ही त्यांची खंत. बंड नव्हे तर शिवसेना वाचविण्यासाठी हा उठाव आहे, असे जोरदार समर्थन पाटील करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार वयाच्या ८० व्या वर्षी पायाला भिंगरी लावल्यासारखे दौरे करतात. अजित पवार हे भल्या सकाळी सहा पासून कार्यालयात बैठका घेतात, सर्व कार्यकरर्त्यांचे फोन घेतात, भेटतात आणि प्रत्येकाचे प्रश्न सोडवतात. त्या चुलनेत युवकांचे नेते म्हणविणारे आदित्या ठाकरे साहेबांचे दौरे कुठेच नाहीत. शिवसेनेच्या एका मंत्र्याचा तोरा तर विचारू नका, असा पाटील यांचा सवाल खूप काही सांगून जातो. संजय राऊत, अनिल परब, अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांचे नाव न घेता चार जणांच्या कोंडाळ्याने आमच्या उध्दव साहेबांना बावळट केले, ही पाटील यांची जळजळीत टिप्पणी आग ओकणारी होती. शिंदे यांनी तेच भाव थोड्या सौम्य शब्दांत प्रगट केले, पण मांडले. दोघांचीही भाषणे म्हणजे शिवसेनेचा अंगार होता. दोघेही अक्षरशः आग ओकत होते. आता या आगीशी खेळ सोपा नाही याची जाणीव भाजपाला आली असेल. शिंदे गटाचे भाजपामध्ये विलीनीकरणसुध्दा सोपे नाही, नव्हे अशक्य आहे. मोदी, शहा यांचे पाठबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कलाकारीचा शिंदे यांनी अवर्जून उल्लेख केला. शिवसेनेचा सूंभ आणि पिळसुध्दा कायम असलेले हे आमदार धनुष्यावर लढणार की कमळ चिन्हावर ते काळच ठरवेल. सरकार अडिच वर्षे टीकेल, असे शिंदे व फडणवीस ठामपणे सांगतात. पण दुसरीकडे शरद पवार म्हणतात, गुजराथ विधानसभेच्या बरोबरच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागतील. भाजपा बरोबर शिंदेंच्या शिवसेनेचे गूळपीठ किती जमते त्यावर हे सगळे अवलंबून आहे. एक मात्र नक्की, ठाकरे यांची मरगळ आलेली, मळभ दाटलेली शिवसेना आता अडचणीत आली आहे. भाजपारुपी अजगराला शिवसेना संपवायची आहे, पण शिंदे, पाटील यांच्यासारखे जन्माने शिवसैनिक असे पर्यंत ते शक्य होईल असे वाटत नाही. शिंदे, पाटील नमस्ते सदा वस्तले च्या साच्यात बसणारे नाहीत. रांगडे शिवसैनिक आहेत. ही आग पचवता येणार नाही. चाणाक्य असलेले फडणवीस काय कला करतात त्यावर पुढचे समिकरण आहे. तोवर म्हणू या, जय महाराष्ट्र !!!