मावळमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला; मावळ, शिरूसह १७ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान

0
687

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रचाराचा “हाय व्होल्टेज ड्रामा” शनिवारी (दि. २७) सायंकाळी संपला. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप-शिवसेना, वंचित बहुजन आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोपांची फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे दोन्ही मतदारसंघा ढवळून निघाले होते. आता २९ एप्रिल (सोमवार) रोजी मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार, शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासह २१ जणांचे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह २३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दोन्ही मतदारसंघात शनिवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी ठिकठिकाणी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांसह मुंबईतील दहा अशा एकूण १७ लोकसभा मतदारसंघात येत्या सोमवारी (दि. २९) मतदान होणार आहे.

चौथ्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांतील दिग्गजांसह मावळ मतदारसंघात पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील चौकार ठोकण्याचे स्वप्न पाहत आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे खासदार होऊन राजकीय अभिनयासाठी उत्सुक आहेत. त्यांनी आढळराव पाटलांचा चांगलाच घाम फोडला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजितदादा पवार यांनी आपले पुत्र पार्थ पवार यांना उभे केले आहे. अजितदादांनी मुलाच्या राजकारणाचा श्रीगणेशा करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. चिरंजीवाच्या विजयासाठी ते मावळ मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत. याच मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार होऊ इच्छित आहेत. या सर्वांचे भवितव्य २९ एप्रिल रोजी मतपेटीत बंद होणार आहे.