भाषण सुरू असताना नितीन गडकरींना भोवळ

0
516

अहमदनगर, दि. २७ (पीसीबी) – भाषण सुरू असताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना आज (शनिवार) पुन्हा भोवळ आली. दरम्यान, स्वत:ला सावरत त्यांनी भाषण आटोपते घेत  खुर्चीत  बसले. त्यानंतर त्यांना बरे वाटू लागल्यावर साईबाबांचे दर्शन घेऊन गडकरी विमानतळाकडे रवाना झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

राहता येथे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी  आयोजित  सभेत बोलत असताना  गडकरी यांना भोवळ आली.  त्याआधी सभास्थळी येताच त्यांना दोनदा लिंबू पाणी देण्यात आले होते. त्यानंतर इतर वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर सर्वात शेवटी गडकरी  भाषणासाठी उभे राहिले.  सभा सुरू असताना त्यांना तिसऱ्यांदा लिंबू पाणी दिले. साधारण २५ मिनिटे बोलल्यानंतर त्यांना अचानक गरगरल्या सारखे होऊन अस्वस्थ वाटू लागले.

गडकरी यांच्या अंगरक्षक आणि  नेत्यांनी लगेच त्यांना सावरत औषध दिले.  त्यानंतर त्यांना पुन्हा लिंबू पाणी देण्यात आले. काही वेळाने गडकरी उठून उभे राहिले आणि मतदारांना हात उंचावून अभिवादन करत निघून गेले.  दरम्यान,  काही दिवसांपूर्वी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कार्यक्रमात गडकरी  यांना अशीच भोवळ आली होती.