मातृमंदीर विश्वस्त संस्थेत आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद

0
239

निगडी, दि. २९ (पीसीबी) – प्राधिकरण येथील मातृमंदीर विश्वस्त संस्थेतर्फे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. या निबंध स्पर्धेत पुणे, अमरावती, जळगाव व सोलापूर या जिल्ह्यातील सुमारे तीस शाळांमधून 350 पेक्षा अधिक स्पर्धेसाठी निबंध आले होते.

संस्थेतर्फे गेली 24 वर्षे राबवित असलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण व गुणगौरव सोहळा मंगळवारी (दि.27) निगडीतील मनोहर वाढोकर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विज्ञान, जीव, वन्य, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांतील जेष्ठ संशोधक डॉ. मिलिंद वाटवे होते. संस्थेचे अध्यक्ष नितीन कारिआ, उपाध्यक्ष शारदा चोरडिया, कार्यवाह यशवंत लिमये, ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांच्यासह शाळांतील विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

संस्थेतर्फे मानाचा ‘तपस्वी विद्धत पुरस्कार’ हा अध्यक्षाच्या हस्ते प्रमुख पाहुणे मिलिंद वाटवे यांना प्रदान केल्यानंतर संस्थेकरिता विशेष योगदाना संबधित व निबंध स्पर्धेतील विजेते व उत्तेजनार्थ यांना पारितोषिक वितरण करण्यात आहे.

सत्कारला उत्तर देताना प्रमुख पाहुणे मिलिंद वाटवे यांनी आपल्या भाषणात गेली 40 वर्षे विविध क्षेत्रातील संशोधनात्मक अनुभव कथन केले. संशोधक होण्यास पात्रता अथवा पीएचडी घेतली, तरच संशोधक होता येते असे नाही. संशोधन वृत्ती तुम्हाला कळायला लागल्यापासून थोडक्यात इयत्ता सातवीपासून तुम्ही संशोधन करू शकता, स्वत:ला प्रश्न निर्माण करून चिकित्सकपणे तुम्हीच उत्तरे शोधा हेच संशोधन आहे. कुठलीही गोष्ट शास्त्रज्ञ म्हणतात, म्हणून लगेच स्वीकारायाची नसते. आपल्या चिकित्सक बुद्धीने आपण तसेच शाळेतील विद्यार्थी ग्रुप सोबत अभ्यास करून तपासायाची असते. अनुत्तरित असे जगात असंख्य प्रश्न आहेत.

परिक्षक म्हणून चंद्रशेखर जोशी, पिंपुडे, पोतदार, पुणतांबेकर, पानसे,श्रीखंडे, शिंदे, चांदबी सैयद यांनी योगदान दिले. सर्व परिक्षकांच्या वतीने चंद्रशेखर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती मोरे यांनी केले. संस्थेच्या उपाध्यक्षा शारदा चोरडिया यांनी आभार मानले.