माऊलींच्या दर्शनासाठी निघालेल्या वृद्ध महिलेचे दागिने पळवले

0
300

आळंदी, दि. ७ (पीसीबी) – वृद्ध महिलेला पुढे गर्दी असल्याचे सांगत सुरक्षेच्या कारणासाठी दागिने काढायला लावले आणि ते दागिने दोघांनी पळवून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 4) सकाळी आळंदी-मरकळ रोडवर आळंदी येथे घडली.

याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 25 ते 30 वयोगटातील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाजारांच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. आळंदी-मरकळ रोडवर तुळजाभवानी मंदिराजवळ आल्यानंतर दोन तरुण त्यांच्याजवळ आले. आज्जी पुढे खूप गर्दी आहे. तुमच्या सुरक्षेसाठी तुमच्या गळयातील माळ आणि कानातील फुले तुमच्या जवळच्या पाकिटात ठेवा, असे त्या दोघांनी सांगितले. फिर्यादी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन 36 हजार 300 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम पाकिटात ठेवले. त्यांनतर एकाने म्हटले, आज्जी पुढे गर्दी आहे. तुमचे पाकीट माझ्याजवळ द्या. गर्दीच्या पुढे गेलो कि तुम्हाला तुमचे पाकीट देतो. त्यांच्यावर विश्वास ठेऊन दागिने आणि पैशांचे पाकीट फिर्यादींनी दिले असता दोघेजण पाकीट घेऊन निघून गेले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.