महाराष्ट्राला सर्वाधिक कोरोना लसीचा पुरवठा करा, खासदार बारणे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

0
234

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) – महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र देशात कोरोना हॉटस्पॉट झाला आहे. ही बाब विचारात घेता अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस द्यावी. त्यासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक लसीचा पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकाकडे केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची भेट घेवून ही मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, देशात महाराष्ट्र कोरोनाने सर्वाधिक बाधीत राज्य आहे. दिवसाला 30 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रातून देशाला सर्वाधिक कर दिला जातो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातील उद्योगधंदे आर्थिक संकटात आहेत. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यस्थेवर होत आहे.

कोरोना लसीची निर्मिती करणारी सीरम इंस्‍टीट्यूट पुण्यातच आहे. असे असताना राज्याला कोरोनाची पुरेशी लस उपलब्ध होत नाही. महाराष्ट्राला कोरोना लसीचे जास्तीचे डोस देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील वाढती रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांना लस दिली तर, राज्यातील कोरोनाची रुग्णवाढ आटोक्यात येईल. महाराष्ट्र सरकारवर पडलेला आर्थिक ताण कमी होईल. सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लस बाहेर देशाला पुरविली जात आहे. त्याच्यातील काही भाग महाराष्ट्राला द्यावा. सर्वाधिक लस पुरवठा केला तर नक्कीच महाराष्ट्रातील कोरोना कमी होण्यास मदत होईल, असे खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.