ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गमावला तीन कामगारानी जीव; गॅसमुळे गुदमरून मृत्यू

0
229

अंबरनाथ, दि.२७ (पीसीबी) : अंबरनाथ मध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीत सफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून टाकीतील गॅसमुळे तिन्ही कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या आयटीआयजवळील इंडस्ट्रीयल ईस्टर केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षद, बिंदेश आणि दिनेश अशी मृत कामगारांची नावं आहेत. रासायनिक कंपनीच्या भूमिगत टाकीची सफाई करण्यासाठी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास हे तीन कामगार टाकीत उतरले होते. पण एकाची तब्येत बिघडल्यामुळे तो औषध आणण्यासाठी दवाखान्यात गेला होता. याच काळात तीन कामगार टाकीत बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली. टाकीतील गॅसमुळे त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला. उत्तर प्रदेशचे तिघेही रहिवासी होते. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे तीन कामगारांचा बळी गेल्याचा आरोप आता केला जात आहे. कलरच्या कामासाठी बोलावून तिन्ही कामगारांना रसायनच्या भूमिगत टाक्या साफ करायला उतरवल्याचा आरोप केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे कामगारांना नाका-तोंडाला बांधण्यासाठी विशेष मास्क दिले नव्हते. कामगारांनी कपडाच बांधलेला होता, असं घटनास्थळी असलेल्यांनी सांगितलं.