“वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या महाविकास आघाडीला अखेर सुबुद्धी झाली”; फडणवीसांनी केलं ‘मविआ’च कौतूक

0
375

मुंबई, दि.२७ (पीसीबी) : मागील काही दिवसांपासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस सचिन वझे, मनसुख हिरेन यासारख्या प्रकरणावरून ठाकरे सरकारला कोंडू पाहत होत. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कामाचं कौतूक केलं आहे. फडणवीसांनी आज एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून सरकारच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. राज्यात करोना रुग्णांचा विस्फोट झाल्याची स्थिती असून, दररोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यानं सरकारने चाचण्याचं प्रमाणही वाढवलं आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबद्दल फडणवीसांनी समाधान व्यक्त केलं आहे.

फडणवीस म्हणाले कि,“गेल्या १० दिवसांत सरासरी १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच करोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय! अधिकाधिक ९० हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच करोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी करोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली.”

मार्चच्या सुरूवातीपर्यंत दररोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली, तर महिना अखेरीस ही संख्या ३६ हजारांवर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ३६ हजार ९०२ नवीन करोना बाधित आढळून आले. तर ११२ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ९०७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यू दर २.४ टक्के आहे. राज्यात सध्या २ लाख ८२ हजार ४५१ रुग्ण उपचार घेत आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात करोना रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरूवात झाली होती. हळूहळू हा आकडा वाढत गेला.