महापालिका शाळांचे विद्यार्थी आजही गणवेशाविना

0
229

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी पालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश मिळालेले नाहीत. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही विद्यार्थी गणवेशाविना आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, अशीच साचेबद्ध उत्तरे महापालिकेकडून दिली जात आहेत.

पिंपरी महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील शाळांमध्ये सर्व मिळून जवळपास ६० हजार विद्यार्थी आहेत. त्यांना महापालिकेच्या वतीने शालेय गणवेश, पी.टी. गणवेश, स्वेटर आदी शैक्षणिक साहित्यांचा पुरवठा केला जातो. साधारणपणे जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या वस्तू दिल्या जातात. यंदा निम्मा ऑगस्ट महिना ओलांडला आणि स्वातंत्र्यदिन तोंडावर आला असतानाही विद्यार्थी गणवेशाविना आहेत. विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाहीत, याविषयावरून पिंपरी पालिकेवर सातत्याने टीकाही होत आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मानव कांबळे यांच्या समन्वयातून विविध राजकीय पक्षांनी पालिका मुख्यालयासमोर नुकतेच आंदोलनही केले. त्यानंतरही परिस्थितीत फरक पडलेला नाही.