महापालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांची कामकाजाची आदली-बदली

0
202

पिंपरी दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजाची आदली-बदली केली असून कायदा विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे समाज विकास विभागाचा पदभार देण्यात आला आहे. तर, इंदलकर यांच्याकडील कामगार कल्याण विभागाचा अतिरिक्त पदभार उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे दिला आहे.

महापालिकेमध्ये प्रशासकीय कारणास्तव वेळोवेळी बदल करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्त पाटील यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांच्या कामकाजात महत्वाचे फेरबदल केले आहेत. यामध्ये “ग’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विनोद जळक यांच्याकडे स्वच्छ सर्वेक्षण कामकाजासाठी समन्वयक पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. तसेच “इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडे अतिक्रमण निर्मुलन विषयक कामकाज सोपविण्यात आले आहे.

कार्यकारी अभियंता संजय घुबे यांच्याकडील बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग काढून “क’ क्षेत्रीय (स्थापत्य) देण्यात आले आहे. त्यांच्याकडील बांधकाम परवाना विभाग पाणी पुरवठा व जल निःसारणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्याकडे दिला आहे. तर “क’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे अनिल शिंदे यांच्याकडे “ह’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे काम सोपविले आहे. स्थापत्य विभागाचे उप अभियंता अनिल राऊत यांच्याकडे जलनिःसारण विभागाचा तात्पुरता अतिरिक्त पदभार दिला आहे.याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी जारी केला आहे.