मशाल भडकली असून भगवा फडकला…! – लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

0
171

मुंबई,दि.०६(पीसीबी) – अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मशाल भडकली आणि भगवा फडकला अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.

“कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं मिळाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. ज्यांच्या मागणीवरुन गोठवलं ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असतील तर ही मतं त्यांना मिळाली असती. “नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या फडणवीसांच्या विधानावर ते म्हणाले, लोकांसमोर सर्व घडलं आहे. आता कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्रात फरक आहे. कोणी काही बोललं तरी जनता उघड्या डोळ्याने पाहत आहेत.

आशिष शेलार यांचा उल्लेख करताच असे खूप लोक बोलतात म्हणत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं. “शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सर्वजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर उत्साहावर थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे,” असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी आपल्या वक्तव्यावर दिलं.

गुजरातमधील निवडणुकीसाठी काही इच्छुक आले आहेत. पण आम्ही संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होतील असं त्यांनी सांगितलं.