मराठी माणसाला प्रभू रामाचा पुतळा साकारण्याचा मान

0
634

अयोध्या, दि. २५ (पीसीबी) –  अयोध्येत प्रभू श्रीरामाचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  केली होती. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर रामाचा १५१ फूट उंची असलेला पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी ५ शिल्पकारांनी रामाच्या मूर्तीच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. त्यापैकी शिल्पकार राम सुतार यांनी साकारलेल्या रामाच्या प्रतिकृतींची योगी यांनी निवड केली आहे.

गुजरातमधील नर्मदा नदीच्या तिरावर सरदार वल्लभ भाई पटेल यांचा १८२ मीटर इतकी उंची असलेला पुतळा उभारण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा राम सुतार यांनीच साकारला होता. आता राम सुतार अयोध्येत उभारला जाणारा रामाचा पुतळा साकारणार आहेत.

दरम्यान, शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमुळे अयोध्येमध्ये राम मंदिराचा मुद्दा समोर आला  आहे. दुसरीकडे काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यात भर घातली. अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर उभारल्या जाणाऱ्या रामाच्या पुतळ्याबाबत योगींनी अंतिम निर्णय घेतला आहे. १५१ फूट उंच रामाची मूर्ती कुठल्या रुपातील असणार हे त्यांनी ठरवले. राम सुतार यांनी साकारलेल्या मूर्तीच्या मॉडेलवर योगी यांनी शिक्कामोर्तब केले आहे.  त्यामुळे रामाचा पुतळा तयार करण्याचा मान एका मराठी माणसाला मिळाला आहे.