चाकणमध्ये जागेच्या वादातून बारा जणांनी मिळून दलित कुटुंबाला केली जबर मारहाण; आरोपींवर अॅट्रोसिटीचा गुन्हा; अद्याप एकही अटक नाही

0
1986

चाकण, दि. २५ (पीसीबी) – जागेच्या वादातून बारा जणांनी मिळून दलित कुटूंबातील दहा जणांना जबर मारहाण करुन त्यांचा अपमान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीत जखमी झालेल्यांमध्ये महिला आणि मुलींचा देखील समावेश आहे. ही घटना शनिवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास चाकण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कुरकुंडी गावच्या हद्दीतील गट नं. २०७ येथील शेतात घडली.

याप्रकरणी अरुण दामु वाघमारे (वय ६३, रा. कुरकुंडी, ता.खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तम बाजीराव पडवळ (वय ५०), बाळासाहेब बाजीराव पडवळ (वय ४०), गुलाब तुकाराम पडवळ (वय ३०), अरुण हरीचंद्र पडवळ (वय ३०), किरण तुकाराम पडवळ (वय २५, सर्व रा.कुरकुंडी, ता. खेड) आणि पडवळ कुटूंबातील सहा महिलांवर (अॅट्रोसिटी) अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंद अधिनियम १९८९ या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास  फिर्यादी अरुण वाघमारे हे त्यांच्या कुटूंबातील ९ जणांसोबत चाकण पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कुरकुंडी गावच्या हद्दीतील गट नं. २०७ येथील त्यांच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी जमिनीच्या वादातून आरोपी पडवळ कुटुंबातील वरील १२ जणांनी मिळून वाघमारे कुटुंबाला जबर मारहाण करुन जखमी केले. जखमिंमध्ये महिला आणि मुलींचा देखील समावेश आहे. तसेच फिर्यादी वाघमारे हे अनुसुचित जाती जमातीचे आहेत हे माहित असताना देखील आरोपींनी, “तुम्ही जातीचा फायदा घेऊ नका” असे बोलून वाघमारे कुटुंबीयांना त्यांच्या शेत जमिनीतून बाहेर हाकलून लोकांसमोर त्यांचा अपमान केला. याप्रकरणी पडवळ कुटूंबातील बारा जणांवर  अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सहायक पोलीस आयुक्त अलसटवार तपास करत आहेत.