मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात टिकू दे; चंद्रकांत पाटलांचे विठुरायाला साकडे

0
575

पंढरपूर, दि. १९ (पीसीबी) – मराठा समाजाला दिलेले आरक्षण कोर्टात टिकू दे आणि दुष्काळी जनतेला एखादा मोठा पाऊस दे ज्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, असे साकड महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विठुरायाला घातले. कार्तिकी एकादशी महासोहळ्यातील विठुरायाची शासकीय महापूजा आज चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे बुद्रुक गावाच्या बाळासो आणि त्यांची पत्नी आनंदीबाई मेंगाणे यांना शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला. यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचेसह मंदिर समिती सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्तिकी सोहळ्यासाठी जवळपास सहा लाखापेक्षा जास्त भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. शासकीय महापूजेनंतर पहाटे साडेतीनपासून सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनाला सुरुवात झाली. गेल्या आषाढी यात्रेला मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांना पूजेपासून रोखण्यात आले होते, याची सल आमच्या सगळ्यांच्याच मनात होती. म्हणूनच कार्तिकी एकादशीपूर्वी आम्ही मराठा समाजाला देण्याचे काम केले, असे पाटील यांनी सांगितले.

आजवर ७० वर्षात अनेक आयोग आले. पण मराठा समाजाला कोणीच मागास ठरविले नव्हते. मात्र, आम्ही या सर्व अडचणींचा अभ्यास करून मागास आयोगापुढे कागदपत्रे सादर केल्याने पहिल्यांदाच मराठा समाजाला मागास ठरविण्यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर या समाजाला न्याय देण्यासाठी कितीही न्यायालयीन लढाया लढायची वेळ आली तरी आम्ही लढू मात्र, मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीची तयारी केलीय ज्यामुळे ही वेळच येणार नाही, असे पाटील म्हणाले. मागास आयोगाने ३० टक्के मराठा समाज मागास असल्याचे मान्य केल्याने सर्वोच्य न्यायालयाची ५० टक्क्यांची अट ओलांडली तरी अडचण येणार नसल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळेच एवढ्या प्रयत्नानंतर आता थेट विठुरायालाही साकड घालून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात यश यावे, अशी प्रार्थना केल्याचेही पाटील यांनी सांगितले.