कोल्हापुरला कामानिमित्त जात असताना थेरगाव परिसरातील डॉ. घाटोळे यांचे अपघाती निधन

0
2445

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – कामानिमित्त सहकारी डॉक्टरांसोबत कारने कोल्हापुरला निघालेल्या वाकड, थेरगाव परिसरातील डॉ. युवराज घाटोळे यांचे अपघाती निघन झाले आहे. ही घटना आज (रविवारी) पहाटेच्या सुमारास पारगाव खंडाळा सातारा येथे घडली.  

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे डॉ. घाटोळे त्यांच्या रूग्णालयातील सहकारी डॉक्टरांसमवेत कोल्हापूरला कामानिमित्त जात असताना त्यांच्या कारचा टायर फुटून अपघात झाला. यावेळी डॉ. घाटोळे यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. घाटोळे यांच्यामागे आई, वडील, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. डॉ. घाटोळे हे पिंपरी – चिंचवड शहराला परिचित असणारे व्यक्तिमत्व. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांगेवाडी गावचे. मुळव्याधाचे शल्यचिकीत्सक असणाऱ्या डॉ. घाटोळे यांचे डांगे चौकात विठ्ठल हॉस्पीटल आहे.

गेल्या १५ वर्षापासून त्यांची या रूग्णालयाच्या माध्यमातून रूग्णसेवा सुरू होती. मनमिळाऊ स्वभावामुळे वैद्यकीय क्षेत्रातही त्यांचा मोठा मित्र परिवार होता. रूग्णसेवेबरोबरच समाजसेवेतही ते अग्रेसर होते. वाकड, थेरगाव परिसरात त्यांचा अफाट जनसंपर्क होता. याशिवाय रूग्णांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.