मनःशांती आणि निरोगी जीवन देणारी योगविद्या !

0
402

नवी दिल्ली, दि. 20 (पीसीबी) : विसाव्या शतकाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत सहभाग घेऊन भारतीय तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांची दिव्य गुढी उभारून भारताच्या गौरवशाली आणि वैभवशाली संस्कृतीची खरीखुरी ओळख संपूर्ण जगाला करून दिली. आपल्या याच गौरवशाली आणि वैभवशाली संस्कृतीचा भाग असलेल्या योगशास्त्राचे महत्त्व जगभरातील इतर देशांना आता पटलेले आहे. २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. गेली १ वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे संपूर्ण जगाला ग्रासलेले असताना आयुर्वेद, योग, प्राणायाम यांचा अवलंब केल्याने अनेकांना कोरोनावर मात करता आली. योगाचे असंख्य फायदे असून मनःशांती आणि निरोगी जीवन देणाऱ्या योगविद्येविषयी या लेखात थोड़क्यात पाहूया.

जगाला मनःशांती आणि व्याधीमुक्त जीवन प्रदान करणारी योगविद्या !

भारतीय ऋषिमुनींच्या दैवी चिंतनातून, आत्मसाक्षात्कारातून आविष्कृत झालेली ही योगविद्या म्हणजे कोणताही धर्मभेद, जातीभेद, लिंगभेद न करता संपूर्ण मानवजातीचे कल्याण इच्छिणारे एक ईश्‍वरी वरदानच आहे. संसाररूपी भट्टीत पोळलेल्यांना मनःशांती देणारी, व्याधीग्रस्तांना शारीरिक आणि मानसिक तापापासून मुक्त करणारी, योगसाधकांना जीव-शिवाची भेट घडवून आणणारी, मानवाची मोक्षपदाची अंतिम इच्छा पूर्ण करणारी, ही योगविद्या आहे. आमच्या परोपकारी पूर्वजांनी जगाच्या कल्याणासाठी जतन करून ठेवलेला हा अनमोल खजिना आहे. अशा या अनमोल खजिन्याचे आम्ही वारसदार असून या योगभूमीत आम्ही जन्मलो, हे आमचे सौभाग्य आहे; पण असे असूनही बहुतेक भारतीय आजही योगविद्येपासून दूर राहिले आहेत, हे आमचे दुर्दैव आहे. जगातील इतर राष्ट्रांनी मात्र या योग खजिन्याचा भरपूर लाभ घेतलेला आहे आणि घेत आहेत. भोगवाद, भौतिकवाद आणि अनेक प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या पाश्‍चिमात्य राष्ट्रांतील जनतेला मनःशांती आणि निरोगी जीवन हवे आहे. यासाठी संपूर्ण जग भारताकडे आशेने पहात आहे; कारण योगविद्येसारखे रामबाण औषध असलेल्या भारताविना अन्य कोणताही देश जगाला मनःशांती आणि व्याधीमुक्त जीवन प्रदान करू शकत नाही. भारतीय योगविद्येमध्ये एवढे मोठे दिव्य सामर्थ्य आणि क्षमता आहे, याची विदेशी पंडितांनी प्रत्यक्ष अनुभूती अन् प्रचीती घेतलेली आहे.

दुर्बल शरिराची कार्यक्षमता वाढवण्याचे सामर्थ्य योगाभ्यासामध्ये असणे

रासायनिक विषारी खते आणि कीटकनाशके फवारून पिकवलेले कडधान्य, फळे, भाजीपाला आदी खाऊन स्वतःचे शरीर कळत-नकळत हळूहळू व्याधीग्रस्त होत चालले आहे. त्यामुळे स्वतःची शारीरिक आणि मानसिक दुर्बलता वाढली आहे, हे बहुतेकांना ठाऊकच नाही. अशा वेळी ही योगविद्या फारच उपयुक्त ठरते. विषारी द्रव्ये बाहेर टाकून दुर्बल शरिराची कार्यक्षमता वाढवण्याचे सामर्थ्य या योगाभ्यासामध्ये आहे.

शरीर एक पवित्र ‘यज्ञकुंड’ असून त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक

स्वतःचे शरीर एक पवित्र ‘यज्ञकुंड’ आहे. या यज्ञकुंडातील जठराग्नीत मांसाहार, दारू, तंबाखू, फास्ट फूड आदी पदार्थ टाकून (खाऊन) हा पवित्र यज्ञ कोणीही भ्रष्ट करू नये. असे करणार्‍या व्यक्तींकडून केलेली योगसाधना सफल होत नाही. ‘मोक्षप्राप्ती’ हे नरदेहाचे अंतिम ध्येय आहे. परमात्मा परमेश्‍वराची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी, मोक्षपदाचा अधिकारी होण्यासाठी योगसाधकाने स्वतःचे आचार, विचार आणि उच्चार यांतून या पवित्र यज्ञकुंडाचे पावित्र्य राखावे.

योगी होऊन परोपकारी आणि पारमार्थिक जीवन जगण्यामध्येच नरजन्माचे सार्थक

‘योग’ या शब्दाचा भावार्थ ‘आपल्या आत असलेल्या जीवात्म्याची चराचरात असलेल्या परमात्म्याशी भेट घडवून आणणे, एकरूप होणे किंवा मिलन होणे अथवा समरस होणे’, असा आहे. या सृष्टीतील ८४ लक्ष योनीला (जीवमात्राला) सृष्टीकर्त्या परमेश्‍वराकडून ऊर्जा पुरवली जाते. त्यामुळेच तुम्ही-आम्ही सर्व आता या क्षणापर्यंत जिवंत आहोत. या ऊर्जेलाच ‘जीवात्मा-अंशात्मा’ म्हणतात. आमच्या भोगवादी वृत्तीमुळे, ‘मी’पणाच्या अहंकारामुळे, भक्तीभावाच्या अभावामुळे आमच्या शरिरातील या दिव्य शक्तीचे, आमच्या देहचालकाचे आम्हाला विस्मरण झालेले असते. योगविद्येच्या माध्यमातून योगसाधकाला ‘आपण परमात्मा परमेश्‍वराचे अंश आहोत’, याचे स्मरण होते. स्वतः प्रकाशित होऊन दुसर्‍यांनाही प्रकाशित करण्याचे दैवी सामर्थ्य या योगसाधनेमध्ये आहे. भोगी होऊन रोगी जीवन जगण्यापेक्षा, योगी होऊन परोपकारी आणि परमार्थिक जीवन जगण्यामध्येच नरजन्माचे सार्थक आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी योगसाधकाने स्वानुभवी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगसाधना करावी.

‘योग’ साधनेतूनच आध्यात्मिक दृष्टी आणि राष्ट्रभक्तीने भारावलेले भूमीपुत्र निर्माण होणे

गौरवशाली, वैभवशाली, सुसंस्कारित, व्याधीमुक्त, आत्मनिर्भर, स्वावलंबी आणि जगद्गुरुपदाला लायक असा भारत घडवायचा असेल, तर त्यासाठी लागणारे सद्गुण, तेजस्वी विचारधारा, देव-धर्म, देश, संस्कृती आस्था, आध्यात्मिक दृष्टी आणि राष्ट्रभक्ती यांनी भारावलेले भूमीपुत्र या ‘योग’ साधनेतूनच घडणार आहेत.
अशा या शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्त करणार्‍या, कोरोनासारख्या विषाणूला यशस्वीपणे प्रतिकार करू शकणार्‍या, मोक्षप्राप्तीचे ध्येय साध्य करून जीव-शिवाची भेट घडवून आणणार्‍या, जगद्गुरुपदाची इच्छा पूर्ण करू शकणार्‍या या सर्वगुणसंपन्न योगविद्येचा देश-विदेशांत निष्काम वृत्तीने प्रसार-प्रचार करणार्‍या सर्व भारतीय संस्था, योगाचार्य, योग साधक आणि योगकार्यात तन-मन-धनाने योगदान देणारे हितचिंतक यांचेे योगदिनानिमित्त अभिनंदन !’
संकलक – प्रा.विठ्ठल जाधव