मधू जोशी ‘जीवन साधना’ पुरस्काराने सन्मानित

0
240

पिंपरी,दि.१८(पीसीबी) – पिंपरी-चिंचवड या कर्मभूमीत साहित्य, संगीत, नाट्य, कामगार चळवळ, समाजकारण, राजकारण, पत्रकारिता आणि अध्यात्म या क्षेत्रांमध्ये सुमारे साठ वर्षे सातत्याने योगदान देणाऱ्या मधू जोशी या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते शनिवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२२ रोजी समरसता पुनरुत्थान गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे ‘जीवनसाधना’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दादा जोशी (वय ९२ वर्षे) यांच्यासह साहित्य, संगीत, नाट्य, समाजकारण, पत्रकारिता या क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी या हृद्य सोहळ्याला उपस्थित होती. याप्रसंगी श्रोत्यांशी साधलेल्या मुक्त संवादातून मधू जोशी यांचा व्यापक जीवनपट उलगडत गेला. बालपणी आईच्या कथनशैलीचे संस्कार, किशोरवयात आचार्य अत्रे यांच्यासोबत त्यांच्या नाटकांमध्ये भूमिका साकारण्याची संधी, १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सादर करण्यात आलेल्या ‘सिंहगर्जना’ या नाटकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नांदी संगीतबद्ध करून प्रत्यक्ष त्यांच्यासमोर गायल्याने प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे आणि खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मिळवलेली शाबासकी, ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ या नियतकालिकांतून कुमारवयात गिरवलेले पत्रकारितेचे धडे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला सहभाग, रमणभाई शहा आणि जार्ज फर्नांडिस यांच्यासोबत कामगार चळवळीतला सहभाग त्यानंतर चिंचवड येथे झालेले स्थलांतर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातील संगीत-साहित्य-नाट्य-कामगार चळवळ-राजकारण आणि समाजकारण यांमधील संस्मरणीय आठवणी, वडील रुग्णालयात अत्यावस्थ असताना निर्देशकांनी घातलेला घेराव, विरोधकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन घेतलेली सभा, असे किस्से ऐकताना श्रोत्यांनी हास्य, कारुण्य, अंतर्मुखता अन् निखळ आनंद अशा विविध भावभावनांची अनुभूती घेतली. “आचार्य अत्रे यांच्या सान्निध्यात एखाद्या गोष्टीची अतिशयोक्ती करतानाही त्यामध्ये सत्याचा अंश असलाच पाहिजे, हे तत्त्व शिकलो!” असेही मधू जोशी यांनी सांगितले. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘गीतरामायणा’तील “दशरथा घे हे पायसदान…”
हे पद सुरेल आवाजात सादर करून दाद मिळवली. मुक्त संवादात नाट्यकर्मी सुहास जोशी, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शीतल शिंदे, साहित्यिक सुभाष चव्हाण, कैलास भैरट, सुहास गोडसे, अरविंद सुर्वे, ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांनी सहभाग घेतला. गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतातून, “पिंपरी-चिंचवड या गाव ते महानगर अशा स्थित्यंतरांमध्ये क्रियाशील योगदान देणारे मधू जोशी म्हणजे अभ्यासू, संयमी आणि समर्पित व्यक्तिमत्त्व कसे असावे याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत!” असे गौरवोद्गार काढले. कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांनी आपल्या प्रास्ताविकातून ‘साहित्य-कला संवाद’ या उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी साहित्यिक, सांस्कृतिक अन् सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना मानवंदना देण्यासाठी प्रतिष्ठान कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे कार्यवाह शिरीष पडवळ यांनी आभार मानले.