महोबा: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात एकच मोठा भूकंप झाला आहे. भाजपच्या माजी जिल्हा मंत्री दीपाली तिवारीयांनी जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांच्यावर अत्यंत गंभीर आणि लज्जास्पद आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “भाजपमध्ये जिल्हा उपाध्यक्ष पद हवे असेल, तर शरीरसंबंध ठेवावे लागतील,” असा अश्लील दबाव जिल्हाध्यक्षांनी टाकल्याचा खळबळजनक दावा तिवारी यांनी केला आहे.
दीपाली तिवारी यांनी केवळ तक्रारच केली नाही, तर फेसबुक लाईव्ह करत आपली व्यथा जनतेसमोर मांडली. त्यांनी एसपी कार्यालयात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली असून, जिल्हाध्यक्षांच्या या वागणुकीमुळे भाजपच्या ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ या घोषणांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जिल्हा उपाध्यक्ष बनवण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी आपल्याला दिल्ली आणि लखनऊला सोबत येण्याची ‘ऑफर’ दिली होती. ही मागणी अमान्य केल्यास पदावरून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. दीपाली तिवारी यांनी असाही आरोप केला आहे की, जर त्यांनी या अटी मान्य केल्या नाहीत, तर त्यांच्या पतीला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठवण्याची धमकी कुशवाहा यांनी दिली होती. केवळ जिल्हाध्यक्षच नव्हे, तर जिल्हा सरचिटणीस आणि जिल्हा उपाध्यक्षही त्यांच्यावर या अश्लील मागणीसाठी दबाव टाकत असल्याचा दावा दीपाली यांनी केला आहे.
हे गंभीर आरोप समोर आल्यानंतर जिल्हाध्यक्ष मोहनलाल कुशवाहा यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत. “हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि मनघडंत आहेत. ही माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेली एक मोठी राजकीय साजिश आहे,” असे म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली आहे. दीपाली तिवारी यांनी आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता त्यांनी कायदेशीर लढाईची तयारी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे भाजप हायकमांडची डोकेदुखी वाढली असून, विरोधकांना सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. आता पोलीस तपासात काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.














































