भाकरी फिरवण्यासोबत पीठ देखील बदलावे लागणार – रोहित पवार

0
426

पुणे, दि. १० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत फेसबुकवरून  कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पक्षामध्ये आलेली मरगळ झटकण्यासाठी भाकरी फिरवण्याची गरज असून नवीन नेतृत्वाला संधी देणार आहे,  असे पवार यांनी म्हटले आहे.

यावर शरद पवार यांचा नातू आणि  जिल्हा परिषद सदस्य  रोहित पवार यांनी भाकरी फिरवण्यासोबत पीठ देखील बदलावे लागणार असल्याचे जाणवतं आहे, असे म्हटले आहे. पक्षाच्या वर्धापन दिनी रोहित यांनी फेसबुक पोस्ट करत आपली भावना व्यक्त केली आहे.

या  फेसबुक पोस्ट मध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे की, आज पक्षाचा २० वा वर्धापन दिन. १९ वर्षाच्या या प्रवासात आपण १५ वर्ष सत्तेत होतो. या १५ वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य हे सर्वांगिण विकासात देशात नंबर एकचे राज्य म्हणून गणले जायचे. पण सातत्याने सत्ता असण्याचे जसे फायदे असतात तसे काही दोष देखील असतात.

अनेकांच्या मते, सत्ता असताना झालेली कामे लोकांपर्यन्त पोहचवण्यास आपण कुठेतरी कमी पडलो. सातत्याने सत्तेत राहिल्यामुळे त्याच त्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली, त्यातून नवीन लोकांना संधी मिळाली नाही आणि जून्या लोकांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद ठेवण्यास महत्व दिले नाही. त्यातूनच लोकांपर्यत पक्षाची कामे पोहचवण्यास आपण कमी पडत गेलो. त्याच त्या लोकांना पक्षामार्फत संधी देण्यात आल्याची नाराजी पक्षात देखील वाढू लागली. या सर्वांचा एकत्रित परिणाम पक्ष संघटनेवर झाला. हे पाहूनच साहेब भाकरी फिरवण्याबाबत बोलले असावेत, काहीअंशी तर भाकरी फिरवण्यासोबत पिठ देखील बदलावे लागणार असल्याचे जाणवते.

२० वा वर्धापन दिन म्हणजे तरुणांच्या वयाप्रमाणे २० वर्ष समजून तरुणांना अधिकाधिक संघी देत पक्षसंघटना वाढवण्यास भर देण्यात यावा, पक्षासोबतच “प्रचंड आशावादी मी राष्ट्रवादी” जोडलं गेलं आहे. याच विचाराने आपण पुढचं लक्ष्य साध्य करु. अस पक्षाचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून मला वाटतं.