नाराज नवज्योत सिंह सिद्धू राहुल गांधींच्या भेटीला

0
424

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातील वाद थांबवण्याचे नाव घेत नाहीयेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान दोघांमधील सुरू झालेले वाद आता काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दरबारी पोहोचले आहेत. सिद्धू यांच्याकडे असलेले खाते बदलण्यात आल्याने त्यांनी दिल्लीत राहुल यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते अहमद पटेल हेदेखील उपस्थित होते.

पंजाबमधील मंत्रिमंडळात करण्यात आलेल्या फेरबदलानंतर त्यांच्याकडे असलेले खाते काढून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच वीज आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला. तसेच निरनिराळ्या योजना आणि अभियानांची समीक्षा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्येही सिद्धू यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली.

राहुल आणि प्रियांका यांच्या भेटीनंतर सिद्धू यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. तसेच आपण राहुल गांधी यांच्याकडे एक पत्र सोपवले असून परिस्थितीची माहिती करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिले आहे याबाबत मात्र त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. सिद्धू यांच्याकडे असलेले खाते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्वत:कडे ठेवले असून सिद्धू यांच्याकडे नवे खाते देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सिद्धू नाराज असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच ते नव्या खात्याची जबाबदारी स्वीकारतील की नाही याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते.