ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना ‘तो’ पराभव डोक्यातच होता- विराट कोहली

0
908

लंडन, दि. १० (पीसीबी) – टीम इंडियाने रविवारी वर्ल्डकपमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी दणदणीत पराभव करत दुसरा विजय नोंदवला. टीम इंडियासाठी या विजयाचे वेगळे महत्त्व असून कर्णधार विराट कोहलीने ते बोलूनही दाखवले आहे. वर्ल्डकपपूर्वी भारताच्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत कांगारूंनी केलेला पराभव आमच्या डोक्यात होता आणि या सामन्यात आम्हाला स्वत:ला सिद्ध करायचे होते अशी प्रतिक्रिया कर्णधार विराट कोहलीने व्यक्त करत पराभवाचा वचपा काढल्याचे समाधान व्यक्त केले. हेच डोक्यात ठेवूनच आम्ही मैदानात उतरल्याचे विराट म्हणाला.

भारताने ती मालिका गमावल्यानंतर रविवारी मिळवलेला विजय शानदार होता असे विराट म्हणाला. आमची सलामीची भागीदारीही उत्तम होती. मी देखील काही धावा केल्या. हार्दिक आणि एमएस (धोनी) यांचा खेळ तर अप्रतिमच होता, अशा शब्दात विराटने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या वेळी विराटने आपल्या गोलंदाजांचीही तोंड भरून स्तुती केली. तो म्हणाला, ‘ अशा प्रकारच्या सपाट खेळपट्टीवर आमच्या गोलंदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. जेव्हा गोलंदाज अशा प्रकारची गोलंदाजी करतात तेव्हा तो कर्णधारासाठी मोठा दिलासा असतो. तुम्ही ३५०+ धावा केल्या म्हणून सर्वकाही सहज घेता येत नाही. त्या ३० धावा तुम्हाला मोठा दिलासा देतात.’