बोपखेलच्या पुलाला संरक्षण विभागाची अंतिम मान्यता. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठपुराव्याला यश

0
421

– उपमहापौर हिराबाई घुले यांची माहिती

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – बोपखेलकरांसाठी बांधण्यात येत असलेल्या पुलाचे संरक्षण विभागाच्या जागेवरील रखडलेले काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संरक्षण विभागाची आवश्यक असलेली अंतिम ‘वर्किंग’ परवानगी मिळाली. त्यामुळे आता संरक्षण विभागाच्या जागेतील पुलाचे काम हाती घेतले जाईल. काही महिन्यात काम पूर्ण करुन बोपखेलवासीयांसाठी पूल खुला करण्याचे नियोजन असल्याचे उपमहापौर हिराबाई घुले यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप, केंद्र सरकारचे बोपखेलवासीयांच्या वतीने उपमहापौरांनी आभार मानले.

उपमहापौर घुले म्हणाल्या, चार वर्षांपासून बोपखेलवासियांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे मुळा नदीवर पुल उभारण्यासाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, निर्मला सीतारामण यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आमदार जगताप यांच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून मी सातत्याने पाठपुरावा केला. लष्कर, संरक्षण विभागाकडून मंजू-या मिळवून आणल्या. त्यानंतर स्थायी समिती, महासभेची मान्यता घेतली. सत्ताधारी भाजपने पुलाच्या कामासाठी निधीची भरीव तरतूद केली.

महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे 4 जानेवारी 2019 मध्ये प्रत्यक्षात काम सुरू झाले. महापालिकेने वेगात काम सुरू केले. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची वर्किंग परवानगी आवश्यक होती. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे परवानगी देण्यासाठी विनंती केली. केंद्रातील आमच्या सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. संरक्षण विभागाचे सचिव आर.एस.यादव यांनी अंतिम वर्किंग परवानगी दिली. त्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेतील काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता तत्काळ काम सुरु केले जाईल, असे उपमहापौर घुले यांनी सांगितले.

”बोपखेलवासीयांसाठी हा पूल एकमेव दळणवनाचे साधन आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नातून पुलाची अंतिम वर्किंग परवानगी मिळाली. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता संरक्षण विभागाच्या जागेवरील नदीच्या पलीकडील बाजूचे काम सुरु करण्यात येईल. तत्काळ काम सुरु करण्याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना देणार आहे. पुलाचे काम वेगात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. लवकरच पूल पूर्ण केले जाईल. बोपखेलवासीयांचा काही वर्षांपासून सुरु असलेला त्रास संपणार आहे.बोपखेलवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पुलाचा प्रश्न सोडविण्यात यश आल्याचा आनंद आहे”, असे उपमहापौर हिराबाई घुले यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”बोपखेल पुलाचे काम सुरु करण्यासाठी अंतिम वर्किंग परवानगी मिळाली आहे. त्याबाबत आयुक्त साहेबांकडे बैठक होईल. कशा पद्धतीने काम सुरु करायचे याचे नियोजन केले जाईल. त्यानुसार पुलाचे काम सुरु केले जाईल”.