बॉलीवूडच्या बरोबरीनं मराठी चित्रपट टीडीएमचं पोस्टर मुंबईत झळकलं..!

0
353

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून गावातील संस्कृती, गावचा रांगडेपणा, स्थानिक-सामाजिक प्रश्नांवर बोलणारे चित्रपट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधुनिकीकरणाच्या युगात गावाकडचे गावपण जपणारे चित्रपट आणणारा प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे पुन्हा एकदा अशाच एका चित्रपटासह आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. २८ एप्रिल रोजी भाऊचा ‘टीडीएम’ हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज होतोय.

तत्पूर्वी या सिनेमाचे जोरदार प्रोमोशन सुरू आहे. सोशल मीडियावर ‘टीडीएम’ची गाणी तुफान वाजत आहेत. तसेच सोलापूरसह महाराष्ट्रभर ‘टीडीएम’चे पोस्टर झळकू लागले आहेत. अशातच ‘टीडीएम’च्या मुंबईतील पोस्टर्सनी मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे.

एप्रिल महिन्यात मराठीबरोबरच बरेचसे ब्लॉकब्लास्टर हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेमेही प्रदर्शित होणार आहेत. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘दसरा’ हा तेलुगू सिनेमा प्रदर्शित झाला असून अजूनही चित्रपटगृहात हा सिनेमा धुमाकूळ घालतो आहे. तसेच ‘दसरा’ नंतर आदित्य रॉय कपूर स्टारर ‘गुमराह’ हा हिंदी सिनेमा ७ एप्रिलला रिलीज झाला आहे. त्यामुळे सिनेमागृहाबाहेर या सिनेमांचे मोठमोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. याखेरीज ईद रोजी (२१ एप्रिल) रिलीज होणारा सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाचे पोस्टरही सिनेमागृहाबाहेर लावण्यात आले आहेत. या बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील बड्या सिनेमांच्या बरोबरीने मराठी चित्रपट ‘टीडीएम’चा पोस्टरदेखील मुंबईतील एका सिनेमागृहाबाहेर लावण्यात आला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दरम्यान ‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट शेतकरी आणि लुप्त होत चाललेला पिंगळा या विषयावर आधारित आहे. टीडीएमची निर्मिती आणि दिग्दर्शन खुद्द भाऊराव कऱ्हाडे यांनी केले आहे. ख्वाडा आणि बबननंतर हा त्यांचा तिसरा मराठी सिनेमा असेल. तसेच सिनेमात नवे चेहरे पृथ्वीराज थोरात आणि कालिंदी निस्ताने हे मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेता पृथ्वीराज हा मुळचा शिरुरमधील रामलिंग गावचा असून तो पुण्यात ऑफिस बॉयचे काम करत असे. सिनेमात पृथ्वीराजच्या भूमिकेवरही प्रेक्षकांची विशेष नजर असेल.