बिहार मध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता…!

0
451

नवी दिल्ली, दि.०८(पीसीबी) – जदयूचे प्रमुख नेते नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे. बिहारमधील जदयू आणि भाजपची युती तुटण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. मात्र, याबाबत जाहीर वक्तव्य करण्यात आलेलं नाही. माजी केंद्रीय मंत्री आर. सीपी. सिंह यांच्यामुळं भाजप आणि जदयू यांच्यात तणाव वाढला आहे. नितीशकुमार यांनी आर.सीपी. सिंह यांना राज्यसभेचं तिकीट नाकारलं होतं. आर.सीपी. सिंह यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून आर.सीपी. सिंह यांना भाजपनं जवळ केल्यानं नितीशकुमार नाराज झाले होते. नितीशकुमारांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे. मंगळवारी होणाऱ्या बैठकीला जदयूच्या सर्व आमदार आणि खासदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे. मंगळवारच्या बैठकीत जदयू आणि भाजप यांच्या युतीचं भविष्य अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नितीशकुमार आणि भाजप यांच्यातील वाद सुरु असल्याच्या चर्चा सुर होत्या. आता नितीशकुमार पुन्हा एकदा यूटर्न घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आहेत. नितीश कुमार यांनी आज झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीकडे पाठ फिरवली होती. काही दिवसांपूर्वी अमित शाह पाटणा मध्ये आले होते. त्यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्रितपणे लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, तरी देखील नितीशकुमार आणि भाजपमध्ये धुसफूस सुरु असल्याचं समोर आलं आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात दोन मंत्रिपदं हवी होती. मात्र, त्यावेळी भाजपनं आर.सीपी. सिंह यांच्याशी चर्चा केली आणि जदयूला एकमेव मंत्रिपद दिलं आणि ते देखील आर.सीपी. सिंह यांनाच मिळाले. तेव्हापासून नितीशकुमार यांची भाजपवर नाराजी असल्याच्या चर्चा सुरु होत्या. नितीशकुमार यांनी आर.सीपी. सिंह यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. त्यामुळं आरसीपी सिंह यांना मंत्रिपद सोडावं लागलं. त्याच वेळी दुसरीकडे नितीशकुमार यांना २०२० च्या विधानसभा निवडणुकीत त्रास देणारे आणि थेटपणे आव्हान देणारे चिराग पास्वान देखील एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळं आता आगामी २४ ते ४८ तासात नितीशकुमार यूटर्न घेणार की भाजपला त्याचं मन वळवण्यात यश येणार हे पाहावं लागणार आहे.

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या घरी एका कार्यक्रमाला नितीशकुमार यांनी उपस्थिती लावली होती. बिहारमध्ये त्या दिवसानंतर तेजस्वी यादव यांनी विरोधी पक्षनेता म्हणून एनडीएवर टीका केली मात्र नितीशकुमार यांच्यावर वैयक्तिक टीका टाळली आहे. तर, दुसरीकडे जदयूच्या नेत्यांनी देखील तेजस्वी यादव यांच्यावर वैयक्तिक टीका करणं टाळलंय. त्यामुळं नितीशकुमार यांनी मोठा निर्णय घेतल्यास देशाच्या राजकारणावर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.