बाळासाहेबांची शिवसेनेच्या पदाधिका-यांचा बुधवारी मेळावा

0
258

– खासदार श्रीरंग बारणे समर्थकांचे होणार शक्तीप्रदर्शन

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाकडून पिंपरी चिंचवड शहरात तब्बल चार महिन्यांनंतर आता कुठे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पिंपरी, चिंचवड आणि मावळचे पदाधिकारी येत्या (बुधवारी) जाहीर केले जाणार आहे. उपनेते, खासदार श्रीरंग बारणे पदाधिका-यांची घोषणा आणि मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान, दुसऱ्या बाजुला मूळ ठाकरेंची शिवसेना एकदम थंड पडल्याने महापालिका निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट भलताच फॉर्मात आहे.

चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात बुधवारी (दि.7) सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा होणार आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. त्यादृष्टीने पक्षाचे काम सुरु आहे. पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या जात आहे. पक्ष संघटन वाढविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे गेल्यानंतर शहरातील अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिला पदाधिकारी मेळावा होत आहे. मावळ, पिंपरी आणि चिंचवडमधील पदाधिकारी घोषित केले जाणार आहेत. खासदार बारणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार बारणे पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट एकदम शांत असल्याने शिंदे गट बाजी मारण्याच्या तयारीत आहे. खासदार बारणे यांचे शिवसेनेतील समर्थक या मेळा्व्याच्या तयारीसाठी झटताना दिसतात. ठाकरे गटाकडून गेल्या चार महिन्यांपासून कुठलेही आंदोलन, मोर्चा किंवा निदर्शने होताना दिसत नाहीत. शहर शिवसेनेसाठी ही धोक्याची घंट समजली जाते.