औद्योगिक पट्यातील सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी महापालिका संपूर्ण सहकार्य करेल – आयुक्त सिंह.

0
189

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांमधून निर्माण होणा-या घनकचरा व्यवस्थापना संदर्भात विविध मागण्या करण्यात येत आहे. घातक कचरा वगळता इतर कचरा संकलनासाठी औद्योगिक आस्थापनांना सर्वंकष माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील औद्योगिक भागातील सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासंदर्भात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे. इतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी महापालिका संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक क्षेत्रातील लघु आणि मध्यम स्वरुपाच्या उद्योगांमधून निर्माण होणा-या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा (सीईटीपी) उभारणे, घनकचरा व्यवस्थापन, औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्था, तळवडे भागातील रेड झोन संदर्भातील महापालिकेशी संबंधित बाबी, विविध सुविधांसाठी आवश्यक असणा-या औद्योगिक महामंडळाच्या जागेचे विषय आणि साहित्य पुनर्वापर सुविधा आदी विषयांबाबत आज (सोमवारी) आयुक्त सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेड, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक असोसिएशन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची संयुक्त बैठक पार पडली.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता रामदास तांबे आणि प्रमोद ओंभासे, उपआयुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता हरविंदर बन्सल, योगेश आल्हाट, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीजचे पिंपरी-चिंचवड विभागाचे अध्यक्ष दिपक करंदीकर, पराग कुलकर्णी, सुधान्वा कोपर्डेकर, प्रलोष गुप्ता, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बेलसरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे, उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबणीस, सीईटीपी फाऊंडेशनचे मिलिंद वराडकर, संजीव शहा, प्रोक्योरमेंट कन्सल्टंट नवनीत झा, महाराष्ट्र इन्व्हारो पॉवर लिमिटेडचे उपमहाप्रबंधक राकेश मिश्रा, अमित बजाज आदी उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रात तयार होणा-या कच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी कचरा संकलन व विलगीकरण केंद्र (एमआरएफ) उभारण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज आणि पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना यांच्या प्रतिनिधींसमवेत विचारविनिमय करुन प्रत्येक भागात घनकचरा व्यवस्थापना संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी आरोग्य विभागाला दिल्या. घातक कचरा वगळता इतर कचरा उचलण्यासंदर्भात महापालिकेच्या वतीने असलेल्या नियमावलीबाबत या कार्यशाळेद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड औद्योगिक भागात महापालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया संयंत्रणा (सीईटीपी) प्रकल्प उभारला जात आहे. त्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता भविष्यात वाढविण्याच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्याच्या सूचना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी बैठकीत दिल्या. शहरातील औद्योगिक भागातील सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यासंदर्भात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे. तसेच इतर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी महापालिका संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन आयुक्त सिंह यांनी यावेळी दिले.