बंडखोर आमदार आज गोव्याला ???

0
203

मुंबई,दि.२९(पीसीबी) – सर्व बंडखोर आमदारांना आज गोव्याला नेले जाणार आहे. त्यानंतर उद्या सकाळी गोव्यावरुन मुंबईत आणले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. दरम्यान, गुवाहाटीत अनेक दिवस ठाण मांडून बसलेले बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदे उद्या राज्यात परतणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी एका वृत्त वहिनीला माहिती दिली. एकनाथ शिंदे आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होत आहेत. बहुमत चाचणीसाठी आम्ही विधानसभेत दाखल होणार आहोत. आम्ही बहुमत चाचणीत दाखल होणार आणि कार्यवाही पूर्ण करणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटीत कामाख्य देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी उद्या विधानसभेत बहुमत चाचणी होत असल्याचं सांगत आपण उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी 48 तास दिले आहेत. त्यानुसार उद्याच विशेष अधिवेशन घेऊन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आलेत. राज्यपालांनी तसे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यामुळे उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा आहे. विधानसभा सदस्यांना आपापल्या जागेवर उभं करूनच त्यांची शिरगणती केली जाईल. राज्यपालांच्या आदेशांनंतर आता ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे.

दरम्यान, राजीनामा न देता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे. बहुमत चाचणी सांगितल्यास शिवसेना सर्वोच्च न्यायालयात तयारी करत होती. आता परिस्थिती जैसे थे ठेवली जात नसल्याविरोधात महाविकास आघाडी सरकार याचिका दाखल करण्यासाठी तयारी करत आहे. बहुमत चाचणीविरोधात शिवसेना न्यायालयात दाद मागणार आहे.