‘फादर्स डे’ ला वडिलांनी चक्क स्वप्नात येऊन दिली चार कोटींच्या दागिन्यांची भेट

0
177

मुंबई, दि.२० (पीसीबी) : चार कोटींच्या चोरीचा उलगडा स्वप्नामुळे झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. लालबाग येथील एका व्यापाऱ्याला वडिलांनी स्वप्नात येऊन चार कोटींच्या दागिन्यांचा खजिना बंद खोलीत असल्याचे स्वप्नात सांगितले होते. खजिना सापडत नसल्याने मुलाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. व तो खजिना मिळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दीपक जैन (रा. लालबाग, मुंबई) असे मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी दीपक जैन यांच्या कुटुंबीयांनी गिरगावच्या विठ्ठलवाडी परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. वडिलांचे निधन झाल्यानंतर ती खोली बंदच होती. त्यानंतर एका रात्री गाढ झोपेत असताना, दीपक यांच्या स्वप्नामध्ये त्यांचे वडील आले. गिरगावातील खोलीत चार कोटींच्या दागिन्यांचा खजिना असल्याचे त्यांनी स्वप्नात सांगितले.

यावरून दीपक यांनी गिरगावातील घर गाठले. मात्र, अनेक महिने येथे कोणी न आल्याने घराची साफसफाई केल्याचे घरमालकाने सांगितले. साफसफाई दरम्यानच दागिने चोरीला गेले असावेत, असा विचार करून जैन यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात चार कोटींच्या सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या चोरीची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तपास सुरू केला. गिरगावमधील घरमालकाने ज्यांच्याकडून घराची सफाई करून घेतली त्यांची माहिती घेतली. तेथील सफाई कामगार प्रकाश, त्याचा मुलगा प्रवीण आणि यासिक या तिघांनी सफाई केली होती. या तिघांवर पाळत ठेवली असता, त्यांच्या राहणीमानात बदल झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनीच हे दागिने चोरल्याचे स्प्ष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक किलो सोन्याची बिस्किटे, ८०० ग्रॅम सोने आणि जवळपास एक कोटी २५ लाखांचे हिरे हस्तगत केले.

दरम्यान, जैन यांच्या वडिलांनी स्वप्नात सांगितलेली माहिती खरी ठरली. चार कोटींच्या चोरीचा उलगडा स्वप्नामुळे झाल्यानं हे प्रकरण सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनले आहे.