प्लॅस्टिक फुलांवर बंदीचा विचार

0
325

वर्धा,दि. ७ (पीसीबी) : लॉकडाऊनच्या काळात फुलशेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्यात प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे, अशी माहिती देत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदीबाबत अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः विषय पुढे नेऊ. या फुलांवर बंदीबाबत लवकरच घोषणा होऊ शकते, असे दादाजी भुसे यांनी सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होत असलेल्या वेबिनारमध्ये भुसे वर्ध्यातून सहभागी झाले होते. त्यांच्या निर्णयाने फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सण-उत्सवाच्या काळात, गणपती-नवरात्र यावेळी आरास करण्यासाठी बऱ्याचदा प्लास्टिकच्या फुलांचा वापर केला जातो. मात्र यापुढे ही फुले विक्रीला न येण्याची शक्यता आहे.

कृषी संजीवनी सप्ताहनिमित्त कृषीमंत्री विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. वर्ध्यातील जिल्हा परिषदेतून त्यांनी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ‘राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड’च्या वतीने आयोजित कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. फुलांच्या निर्यातीबाबतही चर्चा होण्याची गरज मंत्री भुसे यांनी व्यक्त केली. यावेळी भुसे यांनी राज्यात लवकरच प्लास्टिकच्या फुलांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरु असून बंदीची घोषणा काही दिवसातच होईल, अशी माहिती फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली.

एवढंच नव्हे, तर जिल्हा पातळीवर नर्सरी मॉल उभे करुन एका छताखाली विविध फळांची रोपे आणि वेगवेगळ्या फुलांची झाडे आणण्याचा प्रयत्न आहे. राज्यात अशाप्रकारचे सुसज्ज मॉल होऊ शकतात का, यावर विचार सुरु असल्याचं भुसे यांनी सांगितलं.

याचवेळी वर्ध्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केवळ 27 टक्के पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सदोष बियाण्यांच्या विक्रीबाबत बोलताना, महाबीजचे बियाणे सदोष असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना बियाण्याचे पुन्हा वाटप करुन भरपाई करावी, अशी सूचना दिल्याचं कृषिमंत्र्यांनी सांगितलं.