कोविड विरोधी लढ्यात सदगुरु मैदानात

0
392

 

कोईंबतूर, दि. ७ (पीसीबी)  : इशा फाऊंडेशनचे प्रमुख सदगुरु यांच्या ‘भैरव’ या पेंटिंगची ऑनलाईन बोलीत 5.1 कोटी रुपयांना विक्री झाली आहे. या रकमेसह सदगुरुंनी कोविड मदत निधी म्हणून एकूण 9 कोटी रुपये दान केले. सदगुरु यांनी कोरोना लढ्यासाठी निधी उभारण्यासाठी आपल्या भैरव या पेंटिंगचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता. या पेटिंगसाठी ऑनलाईन बोली लागली. तामिळनाडूला कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. याच पार्श्वभूमीवर इशा फाऊंडेशनने तामिळनाडूच्या ग्रामिण भागात कोरोना मदत कार्याला सुरुवात केली. यासाठीच हा निधी वापरला जाणार आहे.

सदगुरु यांनी ही पेंटिंग नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करुन तयार केले आहे. यात शेण, कोळसा, हळद, चुनखडी यांचा उपयोग करण्यात आला आहे. कोरोना निधी उभा करण्यासाठी सदगुरु यांनी आपल्या आवडत्या बैलाचं काढलेलं पेंटिंग लिलावासाठी खुलं केलं. या बैलाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू लॉकडाऊनमध्येच मृत्यू झाला होता. तो आजारी होता, मात्र डॉक्टर उपलब्ध होऊ न शकल्याने त्याच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले नव्हते. यानंतर सदगुरु यांनी त्याच्या आठवणीत त्याचं पेंटिंग काढलं होतं.

सदगुरु म्हणाले, “दररोज मोलमजुरी करुन गुजराण करणाऱ्या मात्र या परिस्थितीत उपजीविकेचं दुसरं कोणतंही साधन नसलेल्या मजुरांना आम्ही पोषण आहार पुरवत आहोत. यामुळे या हजारो मजुरांनी मोठी मदत होत आहे. या वंचितांसाठी निधी उभा राहावा म्हणून आम्ही या पेंटिंगची विक्री केली आहे.”

इशा फाऊंडेशनने तामिळनाडूच्या ग्रामीण भागात उपासमार होत असलेल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत करत आहे. सोबतच जे वैद्यकीय कर्मचारी आघाडीवर राहून कोरोना नियंत्रणाचं काम करत आहेत त्यांनाही साधनसामुग्रीची मदत केली जात आहे. नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून काही औषधांचंही वाटप केलं जात आहे. सदगुरु यांनी उपासमारीतील लोकांना मदत करण्यासाठी याआधी देखील एक पेंटिंग विकलं होतं. हे त्यांचं दुसरं पेटिंग आहे.

मागील 3 महिन्यांपासून सुरु असलेल्या इशा फाऊंडेशनच्या या कामासाठी सदगुरु यांच्या दोन्ही पेंटिंगच्या विक्रीतून मोठी मदत उभी राहिली आहे. तामिळनाडू हे भारतातील कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांपैकी एक आहे. येथे 1 लाखपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. चेन्नईत 60 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे येथे अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत.