प्रश्न पिंपरी-चिंचवडच्या पाण्याचा; विरोधकांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना ठरवले चोर

1031

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्कळित पाणीपुरठ्याच्या मुद्द्यावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (दि. २०) तब्बल सहा तास घमासान चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर ताशेरे ओढत पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यानुसार महापौरांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाला ३१ ऑक्टोबरची डेडलाइन देऊन सभा तहकूब केली. दरम्यान सभेपूर्वी पाण्याच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आंदोलनात घोषणा देताना नगरसेवकांचे भान सुटले. पिंपरी-चिंचवडच्या पाणी प्रश्नावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोर असल्याच्या घोषणा दिल्या. त्यावरून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी सभागृहात बोलताना इतक्या खालच्या पातळीचे राजकारण आम्ही कधीच केले नसल्याचे सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला.

गेल्या महिनाभरापासून पिंपरी-चिंचवडचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक सुद्धा वैतागले आहेत. खुद्द महापौर राहुल जाधव यांनी सुद्धा पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांवरून आंदोलनाची भाषा केल्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले. या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. सभेत शहराच्या पाणीप्रश्नांवर तब्बल सहा तास चर्चा झाली. सभेत बोलताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे नियोजनशून्य कारभार आणि पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा खरपूस समाचार घेतला. दोन-तीन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या काही जणांनी या गंभीर विषयांवर अभ्यासपूर्ण मते मांडली.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, मंगला कदम यांनी सत्ताधारी भाजपचे हे अपयश असल्याचे सांगितले. सत्ता येऊन दोन वर्षे होत आले, तरी भाजपला शहरातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडवता येत नसल्याची टिका केली. सत्ताधारी केवळ निविदांमध्ये रिंग करण्यात मश्गुल असल्याचा आरोपही केला. सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांनी महापालिकेच्या चाललेल्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला. पिंपळेनिलखचे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी निवडून दिलेल्या नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडवू शकत नसल्यामुळे महापालिकेत येण्याची इच्छाच होत नसल्याचे सांगितले. भाजपच्याच संदिप वाघेरे यांनी कालचा गोंधळ बरा होता, असे सांगत पक्षाला घरचा आहेर दिला. भाजपचे प्रथम महापौर नितीन काळजे यांनी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केल्यास सर्व भागात पुरेशा दाबाने पाणी येईल, अशी भूमिका मांडली. भाजपच्याच विकास डोळस यांनी नागरिकांना पुरेसे पाणी देता येत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली.

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या इतर नगरसेवक तसेच मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले यांनीही शहराच्या विस्कळित पाणीपुरवठ्यावर संतप्त भावना व्यक्त केली. शहराचा पाणीपुरवठा विस्कळित होण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर हे सुद्धा जबाबदार असल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही, तोपर्यंत महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब ठेवण्यात यावी, अशी मागणी केली. नगरसेवकांच्या भावना लक्षात घेऊन महापौर राहुल जाधव यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळित करण्यासाठी प्रशासनाला ३१ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली. या मुदतीत पाणीपुरवठा सुरळित न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले.

दरम्यान, सभेपूर्वी राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकत्र येत महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पाणीप्रश्नावर आंदोलन केले. परंतु, या आंदोलनात घोषणाबाजी करताना विरोधी पक्षाच्या या नगरसेवकांचे भान सुटले. पिंपरी-चिंचवडच्या पाणीप्रश्नावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोर असल्याच्या घोषणा या विरोधी पक्षाच्या नगरसेवाकांनी दिल्या. त्यावरून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांनी सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान हा देशाचा असतो, तर मुख्यमंत्री हा राज्याचा असतो. तो कोणत्याही पक्षाचा नसतो. आता विरोधी पक्षात असलेले नेते यापूर्वी सत्तेत होते आणि ते मोठ्या पदावर होते. त्यावेळी आम्ही विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणून जनतेचे प्रश्न मांडताना महापालिकेच्या सभागृहात किंवा सभागृहाबाहेर तत्कालिन पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री चोर असल्याच्या घोषणा कधीच दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.

आताच्या विरोधकांएवढी खालची पातळी आम्ही कधीच गाठली नसल्याचे सांगत सीमा सावळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चोर म्हणण्याच्या विरोधकांच्या कृतीचा निषेध केला. राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते. सर्व अधिकार त्यांच्याच हातात असताना पवना जलवाहिनी आणि आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी आणण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. त्यामुळे आम्ही अजितदादा पवार चोर आहेत, असे म्हणण्याचे नीच राजकारण आम्ही कधी केले नाही. ही आमची संस्कृती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोर असल्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्यांनतर त्यावर सभागृहात अवाक्षरही न काढणाऱ्या भाजप नगरसेवकांच्या नितीमत्तेबाबत सीमा सावळे यांनी सभागृहात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आपल्याच पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना विरोधक चोर म्हणत असताना आपण मात्र केवळ सेटिंग करण्यात गुंतलोय का?, असा सवाल त्यांनी स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केला.