प्रमोद महाजनांच्या नाडीवर हात ठेवून जप करून वाचवले असते; खासदार खैरेंचा खळबळजनक दावा  

0
925

औरंगाबाद,  दि. २३ (पीसीबी) – भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या गोळीबार झाल्यावर ते अत्यवस्थ होते. त्यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या पर्यंत मला पोहचू दिले असते, तर त्यांच्या नाडीवर हात ठेवून जप करून त्यांना मी वाचवले असते, असा खळबळ दावा शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज (शनिवार) येथे केला आहे.  

औरंगाबाद येथे राज्य सरकारने आरोग्य मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात खैरे बोलत होते.  यावेळी ते म्हणाले की,  माझ्याकडे डॉक्टरची डिग्री नाही. मात्र, मी अनेक लोकांना बरे केले आहे. मी नाडीला हात लावून जप केला, तर संध्याकाळपर्यंत मृत्यू होईल, असे डॉक्टरांनी घोषित केलेले रुग्णही  बरे होतात, असा अजब दावा त्यांनी यावेळी केला.

प्रमोद महाजन रुग्णालयात असताना मला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही तरी करा, असे सांगितले होते. त्यानंतर मी त्यांना एक पुडी प्रमोद महाजन यांच्या उशी खाली ठेवायला दिली होती, असेही खैरे यांनी सांगितले.  बारा दिवस ते जिवंत होते. परंतू आतमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता म्हणून पुडीला हात लावून जप झाला नाही. त्यामुळे मी जीवनात पहिल्यांदाच  अपयशी  झालो , असे ते म्हणाले.  हे  सर्व अंधश्रद्धा नाही , असेही खैरे म्हणाले.