पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव माझ्या मुलाच्या वयाचे; त्यांना माफ करूया – हसन मुश्रीफ  

0
2496

कोल्हापूर, दि. १५ (पीसीबी) – पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव आणि राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादानंतर आता मुश्रीफ यांनी समंजस्याची भूमिका घेतली आहे. गुरव  माझ्या मुलाच्या वयाचे आहेत, त्यांना माफ करुया, असे म्हणत  त्यांनी  या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.   

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीच्या दिवशी सुरज गुरव यांनी हसन  मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांना महापालिका इमारतीमध्ये जाण्यापासून रोखले होते.    त्यानंतर गुरव आणि मुश्रीफ यांच्यामध्ये शाब्दिक  खडाजंगी  झाली होती. मला गडचिरोलीच काय घरात बसवले, तरी तुम्हाला आत सोडणार नाही, अशी भूमिका गुरव यांनी घेतली होती. तर गुरव यांच्यावर हक्कभंग आणण्याचा इशारा मुश्रीफ यांनी दिला होता.

या प्रकरानंतर गुरव आणि मुश्रीफांच्या वादंगाचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. गुरव यांच्या या धाडसाचे अनेकांकडून कौतुक केले होते. तसेच गुरव यांचे फलक लावून त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले होते. हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चिले जात होते. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी गुरव यांच्यावर  कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आता मुश्रीफांनी मवाळ भूमिका घेत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.