अरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे- तस्लिमा नसरिन

0
1170

नवी दिल्ली, दि. १५ (पीसीबी) – अरेंज-मॅरेज हा मूर्खपणाच असून हे बंद झाले पाहिजे, असे मत वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केले आहे. लग्न हे प्रेमाच्या आधारेच केले पाहिजे आणि तरूण पिढीला त्यांच्या आवडीनुसार लग्न करण्याची मुभा दिली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरिन यांनी ट्विटरवर प्रेमविवाहाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. तस्लिमा नसरिन ट्विटमध्ये म्हणातात, अरेंज-मॅरेज हा एक मूर्खपणाच असतो, हे बंद झाले पाहिजे. लग्न हे प्रेमाच्या आधारेच झाले पाहिजे. तस्लिमा नसरिन यांच्या या ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊसही पडला. ‘ज्यांच्या नशिबी प्रेमविवाह नसेल त्यांनी काय करावे, प्रेमविवाह करणाऱ्यांचेही घटस्फोट होते’, अशा प्रतिक्रिया त्यांच्या ट्विटवर आल्या.

नसरिन यांनी सर्व धर्मांमध्ये महिलाविरोधी प्रथाही बंद झाल्या पाहिजे, अशी भूमिकाही मांडली. या प्रथांमुळे महिला अपवित्र असल्याची धारणा वाढते. त्यामुळे या प्रथा बंद होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. तस्लिमा नसरीन या वादग्रस्त बांगलादेशी लेखिका आहेत. त्यांची ‘लज्जा’ ही कादंबरी चांगलीच वादग्रस्त ठरली. ज्यामुळे बांगलादेशने त्यांच्याविरोधात फतवा काढून त्यांना देशाबाहेर काढले. यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला.