पुत्र प्रेमापोटी राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार ?

0
518

शिर्डी,  दि. २४ (पीसीबी) – राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील हे पुत्राच्या हट्टापायी  भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.  प्रवरानगर येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

पुत्र डॉ. सुजय विखे पाटील  नगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश  राधाकृष्ण विखे यांनी दिले आहेत. त्यांनी पक्ष स्पष्ट केला  नाही. त्यामुळे  सुजय  लोकसभा भाजपच्या तिकिटावरच  लढवतील,  अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान,  नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे  आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसच्या विखे यांना सोडण्यास शरद पवार यांनी स्पष्ट नकार दिला आहे. आमच्या वाट्याला असलेली ही जागा आम्हीच लढवू, असे त्यांनी काँग्रेसला सांगितले आहे. यावर  सुजय विखे –पाटील यांनी अपक्ष लढण्याचा इशारा  दिला आहे. तर राष्ट्रवादीही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सुजय यांना  भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही.