युतीवर नाराज रामदास आठवलेंना राष्ट्रवादीकडून भेटीचे निमंत्रण

0
638

नागपूर, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा भेटीसाठी निरोप  आला आहे. मात्र,  सध्या तरी मी भुजबळ यांची भेट नाकारली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माझे शत्रू नाहीत, त्यांना भेटायला माझ्यावर बंदी नाही. मी त्यांना कधीही भेटू शकतो, असे सूचक  विधान केंद्रीय मंत्री रामदास  आठवले यांनी केले आहे.  

आगामी निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे. मात्र त्यांचा महत्त्वाचा मित्रपक्ष रिपाइंचे  अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत.  नागपुरात बोलताना  आठवले यांनी  युतीत जागा न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गुलाम म्हणून शिवसेना-भाजपसोबत राहणार नाही, असा इशाराही आठवलेंनी दिला. युतीची घोषणा करण्यापूर्वी आमच्यासोबत चर्चा करणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. युतीची चर्चा झाल्यानंतर भाजपवाले म्हणतात की शिवसेना तुमच्यासाठी जागा सोडायला तयार नाही. मात्र, शिवसेना का जागा सोडत नाही, त्यांना आमची मते नको आहेत का? असा सवाल करून  राजकारणात सर्व मार्ग खुले असतात,  असे सुचक विधान  आठवलेंनी केले.