पुण्यातील लष्कर न्यायालय परिसरात सराईत आरोपींकडून पोलिसांना मारहाण

0
1198

पुणे, दि. १० (पीसीबी) – न्यायालयात सुनावणीसाठी हजर करण्यात आलेल्या दोघा सराईत आरोपींना  नातेवाईक आणि मित्रांना भेटू दिले नाही या कारणावरुन पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.९) लष्कर न्यायालयाच्या आवारात घडली.

मोहसीन अब्बास शेख (वय २२) आणि मुजमिल उर्फ मूज्जू मजित खान (वय २२) असे या दोघा आरोपींची नावे आहेत. या दोघांवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहसीन आणि मुजमिल हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. ते येरवडा कारागृहात बंधिस्त होते. बुधवारी तारीख असल्याने त्यांना लष्कर कोर्टात हजर करण्यात आले होते. या दरम्यान त्यांच्यावर कोणी हल्ला करू नये आणि कोणी त्यांच्याशी बोलू नये यासाठी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. न्यायालयाच्यासमोर या दोघांचे नातेवाईक आणि मित्र  मोठ्या संख्येने जमा झाले होते. ते या आरोपींना भेटण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे पोलिसांनी कोणालाही आरोपींना भेटू आणि बोलू दिले नाही. यामुळे आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि जेलमधून सुटल्यावर बघून घेण्याची धमकी दिली.