पुण्यातील पतीने महाबळेश्वरमध्ये पत्नीचा गळा चिरुन स्वत:ही केली आत्महत्या

0
2153

महाबळेश्वर, दि. ६ (पीसीबी) – अकरा वर्षाच्या मुलासोबत महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पतीने पत्नीचा गळा चिरुन स्वत:ही आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.५) महाबळेश्वरमधल्या येथील एका हॉटेलात घडली.

पती अनिल शिंदे आणि पत्नी सीमा शिंदे (रा. विश्रांतवाडी) असे मयत दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा आदित्य हे महाबळेश्वरमध्ये फिरायला गेले होते. बुधवारी (दि.५) ते महाबळेश्वरमधील एका हॉटेलमध्ये उतरले. रात्री एकच्या सुमारास अनिल आणि सीमा यांच्यात वाद झाला. या भांडणामुळे संतापलेल्या अनिलने सीमा यांच्यावर चाकूने वार करुन त्यांची हत्या केली. यानंतर अनिलनेही आत्महत्या केली. हॉटेलच्या खोलीतच हा सर्व प्रकार घडला. त्याच खोलीत त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा आदित्यही होता. आदित्यने आईला हाक मारली. पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकाराने घाबरलेल्या आदित्यने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनीच या घटनेची माहिती महाबळेश्वर पोलिसांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला होता, याचा पोलीस तपास करत आहेत.