साताऱ्यात अभिनेत्याची गाडी फोडून कार्यकर्त्यांनी दाखवली खासदार उदयनराजेंची धमक  

0
785

सातारा, दि. ६ (पीसीबी) – साताऱ्यात फक्त माझेच चालते… हा ‘फाइट’ या चित्रपटातील डायलॉग सध्या चांगलाच गाजत आहे.  मात्र, हा डायलॉग खासदार उदयनराजे समर्थकांना  या चित्रपटातील अभिनेत्याच्या तोंडी शोभून दिसला नाही. त्यामुळे  त्यांच्या समर्थकांनी आज (गुरूवार) अभिनेता जीत मोरे यांच्या गाडीची   तोडफोड केल्याचा प्रकार साताऱ्यात घडला आहे.   

‘फाइट’ या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषद झाली.   यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक जिम्मी मोरीया, निर्माता ललित ओसवाल व अभिनेता जीत मोरे, अभिनेत्री सायली जोशी  आदी उपस्थित होते.  यावेळी हॉटेलजवळ लावलेली जीत मोरे याची कार खासदार उदयनराजे समर्थकांनी फोडली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण  निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

‘फाईट’ चित्रपटात अभिनेता जीत मोरेच्या तोंडी ‘साताऱ्यात फक्त माझेच चालते’…असा डायलॉग आहे. तो उदयनराजे समर्थकांना आवडला नाही.  त्यामुळे त्यांनी साताऱ्यात फक्त उदयनराजेंचे चालते, असे  दाखवून देण्यासाठी जीत यांच्या गाडीची तोडफोड केली.  यावेळी उदयनराजे समर्थकांनी हा डायलॉग चित्रपटातून काढून टाकावा, अन्यथा हा सिनेमा आम्ही प्रदर्शित होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.