आता बाजारभावाप्रमाणे गृहकर्जाचे व्याजदर;रिझर्व्ह बँकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
1075

मुंबई, दि. ६ (पीसीबी) – येत्या आर्थिक वर्षापासून गृहकर्जांचे व्याजदर बाजारभावाशी  सुसंगत ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे.  सध्या सीटी बँकच बाजारभावाप्रमाणे व्याजदर आकारते. तर इतर कोणतीच बँक बाजारभावानुसार गृहकर्जाचे व्याजदर ठरवत नाही. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. आता बाजारभावानुसार व्याजदर आकारल्यास घर खरेदी करणाऱ्यांना दिलासा  मिळणार आहे.  

बाजारभावात  वाढ झाली की बँकांचे व्याजदर वाढत होते. मात्र, बाजारभाव घट झाली की,  व्याजदर कमी होत नव्हते. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत होते. ही बाब लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक गेल्या अनेक वर्षांपासून रेपो रेट आणि गृहकर्जाचे व्याजदर बाजारभावाशी  सुसंगत करण्याच्या विचारात होती.   आता  त्याची पत्यक्षात अंमलबजावणी  करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.  व्याजदरांसाठी बाजारभावाचा निकष  ठरवल्यास व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर बाजाराचा आढावा घेऊन राष्ट्रीयीकृत बँकांना ग्राहकांसाठी व्याजदरांची आखणी करणे सुलभ होणार आहे.

याबाबत रिझर्व्ह बँकेला जनकराज समितीने काहीवर्षांपूर्वी शिफारस केली होती.  दरम्यान बाजारभावानुसार गृहकर्जांचे व्याजदर सुसंगत ठेवण्यास बँकांना त्यांच्या कर्जविषयक धोरणांमध्ये  काही सुधारणा  कराव्या लागणार आहेत.  पुढील चार महिन्यात या  सुधारणा  करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेने इतर  बँकांना दिल्या आहेत.