पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकित भाजपची बाजी.

0
139

पुणे, दि. २३ (पीसीबी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर १५ हजार ६४९ मतांनी विजयी झाल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडे आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते. ५०० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.