पिंपरी चिंचवड शहरात अटीशर्थींवर सलून, ब्युटीपार्लर सुरू

0
652

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – गेले दोन महिने कोरोनाच्या टाळेबंदित बंद असलेले सलून, ब्युटी पार्लर आदी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू होणार आहे. शहर रेड झोन मधून वगळण्यात आले असून हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहरातील सम विषम तारखेनुसार दुकान खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर अटी आणि शर्तीसह सलून आणि ब्युटी पार्लर खुली करू शकतात, असे आदेश महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

शहरामध्ये ब्यूटी पार्लर, सलून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून व्यवसाय सुरु करण्यासाठी परवनगी घेतलेल्या व त्याचे नियमानुसार दरवर्षी नुतनीकरण केलेल्यांना व्यवसाय सुरू करता येणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांचे स्तरावर सहा.आरोग्याधिकारी यांचेमार्फत परवानगीचे काम होईल. परवाना नसलेल्या किंवा परवाना नुतनीकरण न केलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.
घ्यावयाची काळजी
– सलून किंवा ब्युटी पार्ल्सरमध्ये पुरेसा सुर्यप्रकाश आणि मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था उपलब्ध असावी.
– दुकानामध्ये असलेल्या दोन खुच्च्यामध्ये किमान १ मिटरचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. ज्या ठिकाणी ३ खुच्च्या आहेत त्या ठिकाणी एका वेळी १ ग्राहक, ज्या ठिकाणी ५ खुच्च्या आहेत, त्या ठिकाणी २ ग्राहक आणि ज्या ठिकाणी ५ किंवा अधिक खुर्च्या असतील तिथे एका वेळी तीन ग्राहकांना बसता येणार आहे.

– ब्युटी पार्लर, सलून यामध्ये येणा-या ग्राहकांसाठी दुकानाबाहेर सॅनिटायझर डिस्पेन्सर (foot operated or no contact sanitizer dispenser) बसविणे आहे.

– प्रत्येक कामगाराने केशकर्तनापुर्वी व नंतर हात धुणे व निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहील. केशकर्तनालयामध्ये येणा-या प्रत्येक ग्राहकाने व तेथे काम करणा-या व्यक्तींनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांना केवळ केशकर्तनावेळी अथवा शेव्हींग करताना मास्क काढू शकतील. ग्राहकारीता प्रत्येक वेळी तोंड पुसणे इ.करीता नविन नॅपकीन वापरण्यात यावे अथवा वापरण्यात आलेला नॅपकिन प्रत्येक वापरानंतर सोडिअम हायपोक्लोराईट मध्ये किमान ३० मिनिटे भिजवून त्यानंतर धुतलेला व पूर्णतः वाळलेला असणे आवश्यक आहे. ग्राहकांना स्वत:चे नॅपकिन आणण्यास सांगितला तर उत्तम. केशकर्तनाकरिता अथवा शेव्हींगकरिता वापरण्यात येणारे सर्व साहित्य उदा. कात्री, उस्तरा इ. प्रत्येक वापरापूर्वी सोडिअम हायपोक्लोराईट (०.१%) द्रावणामध्ये ब्लिचिंग, डेटॉल किंवा तत्सम द्रावणामध्ये निर्जतूक करुन वापरावे. शेव्हींगकरिता वापरण्यात येणारे ब्रश प्रत्येक वेळी धुणे व निर्जंतुक करणे शक्य नसल्याने शेव्हींग करिता फोम अथवा जेलचा वापर करावा. ब्रशचा वापर करणे वर्जित राहील.

– प्रत्येक ग्राहक खुर्चीवर बसण्यापूर्वी त्या खुर्चीचे सोडिअम हायपोक्लोराईट अथवा सॅनिटायझर ने निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. ग्राहकांना केशकर्तनालयासाठी अथवा शेव्हींसाठी वेळ निश्चित करुन ठराविक वेळेमध्येच बोलविण्यात यावे. दुकानामध्ये अथवा दुकानाबाहेर गर्दी होता करू नये.
– चेहरा अथवा डोक्याची मसाज करण्याकरिता येणा-या ग्राहकांना मसाज करतांना डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरणे बंधनकारक राहील, ग्लोव्हज न वापरता मसाज करण्यात येऊ नये.

– संपूर्ण केशकर्तनालयाचे दर ४ तासांनी सोडिअम हायपोक्लोराईट (१%) द्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच दर ४ तासांनी जमीन / फरशी पुसणे आवश्यक राहील, केशकर्तनालयाचे आत तसेच बाहेर सामाजिक अंतराचे (Social distancing) पालन करणे बंधनकारक राहील. केशकर्तनालयाकरिता वेळ स.९,०० ते सायं. ५,०० अशी राहील.