पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत दुचाकी चोर सुसाट

0
212

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील हिंजवडी, वाकड, तळेगाव एमआयडीसी, चाकण, चिंचवड पोलीस ठाण्यात चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत. या पाच घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, रोख रक्कम, दुचाकी असा एकूण तीन लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 64 हजार रुपयांचे 80 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 18 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत सुस रोड, बावधन येथे घडली. याप्रकरणी अजय रामकृपाल प्रजापती (वय 32, रा. साई कॉलनी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या बहिणीच्या घरात हा चोरीचा प्रकार घडला आहे.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, तीन मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण 64 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी साडेआठ ते नऊ वाजताच्या कालावधीत विघ्नहर्ता कॉलनी, थेरगाव) येथे घडली. विजय शिवाजी कुदळे (वय 44) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुरूम चोरीचा प्रकार घडला. मंगळूर गावच्या हद्दीत गट क्रमांक 145 मधून दत्तात्रय मारुती कलावडे (रा. वारंगवाडी, ता. मावळ) आणि अन्य तीन जणांनी मिळून जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने 75 हजारांचा मुरूम चोरी केला. याप्रकरणी जीत हसमुख जैन (वय 31, रा. हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन चोरीला गेले आहेत. निलेश ज्ञानेश्वर पारधी (वय 22, रा. कान्हेवाडीबु. पो. कडधे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पारधी हे महाळुंगे येथील बजाज कंपनीत काम करतात. कंपनीत मोबाईल फोन नेण्यास परवानगी नसल्याने त्यांनी त्यांचा मोबाईल फोन दुचाकीच्या टूलबॉक्समध्ये ठेवला आणि मंगळवारी (दि. 26) सकाळी सहा वाजता ते कंपनीत कामाला गेले. सायंकाळी चार वाजता कामावरून परत कंपनी समोरील पार्किंगमध्ये आले असता त्यांची दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी नव्हती. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची 10 हजारांची दुचाकी आणि 12 हजारांचे दोन मोबाईल फोन चोरून नेले.

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचवडगाव येथील स्मशानघाटावर दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आला. रोहित पंडित गुरव (वय 32, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी स्मशानघाटावरून चोरून नेली आहे.