कनेक्शन कट केल्याने महावितरणच्या कर्मचा-यास मारहाण; पाच जणांना अटक

0
249

निगडी, दि. २९ (पीसीबी) – वीज कनेक्शन कट केल्याने सहा जणांनी मिळून महावितरणच्या कार्यालयात तोडफोड केली. तसेच महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 28) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडच्या थरमॅक्स चौक, चिंचवड येथील कार्यालयात घडला.

रुपेश गोविंदन नामबियार (वय 35, रा. आकुर्डी), रियाज जीलानी मोहोळकर (वय 32, रा. बिजलीनगर, चिंचवड), रिजवान अशफाक शेख (वय 32, रा. काळभोरनगर, चिंचवड), फैज निजाम सय्यद (वय 32, रा. भोईर कॉलनी, चिंचवड), मोहसीन मकसूद भालदार (वय 30, रा. सुदर्शन नगर, चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यासह अरबाज हारून शेख (वय 29, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राहुल खंडेराव जाधव (वय 30, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेडमध्ये काम करतात. त्यांनी आरोपी रुपेश नामबियार याचे लाईट कनेक्शन कट केले. याचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली. तसेच फिर्यादी जाधव यांना शिवीगाळ, धमकी देत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जाधव यांना आरोपींनी त्यांच्या गाडीत बळजबरीने बसवून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.