पालिकेची फसवणूक करणार्या ‘त्या’ 18 ठेकेदारवर फौजदारी

0
170

पिंपरी, दि. 16 (पीसीबी): खोटी कागदपत्रे सादर करून महापालिकेची कामे मिळवणा-या ठेकेदारांवर पालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार आहे. असे 18 ठेकेदार पालिकेच्या निदर्शनास आले आहेत. त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध विकासकामांसाठी निविदा मागवल्या जातात. यामध्ये स्पर्धा होऊन निविदा भरली जाणे अपेक्षित आहे. एखादे काम मिळवण्यासाठी ठेकेदार तथा कंत्राटदाराला अनामत सुरक्षा ठेव, बँक हमीपत्र अशी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात.

मात्र, अनेक विभागात, विशेषत: स्थापत्य विभागातील कामांमध्ये बनावट कागदपत्रांचा सर्रास वापर झाल्याची बाब उघड झाली आहे. आर्थिक सुरक्षेसह आवश्यक पात्रता निकषात बसत नसतानाही कामे मिळालीच पाहिजे, या हेतूने ठेकेदारांनी अशी कृती केल्याचे काही प्रकरणात दिसून येत आहे. 18 ठेकेदारांनी मिळून 108कामे घेतली असल्याची बाब नुकतीच पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे.

पालिकेची फसवणूक करणा-या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर फौजदारी खटले देखील दाखल केले जाणार आहेत. ठेकेदार आणि त्यांना मदत करणा-या संबधित अधिका-यांवर येत्या सात दिवसात कारवाई कारवाई, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.