भारताच्या अंशुचे रौप्यपदकावर समाधान

0
178

पुणे, दि.१७ (पीसीबी) : भारताच्या अंशु मलिक हिला अखेरीस वैयक्तिक विश्वकरंडक कुस्ती स्पर्धे महिलांच्या ५७ किलो वजनी गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सर्बियात बेलग्रेड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत तिला अंतिम लढतीत मालदिवच्या निचिताने गुणांवर ५-१ असे पराभूत केले.

कोरोनाच्या संकटामुळे जागतिक स्पर्धा रद्द करून जागतिक महासंघाने वैयक्तिक विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन केले आहे. अंशुने मिळविलेले पदक या स्पर्धेतील भारताचे पहिलेच पदक ठरले. यापूर्वी ग्रीको रोमन प्रकारात भारतीय मल्ल अपयशी ठरले. पुरुषांच्या फ्री-स्टाईल विभागातही सुरवातीच्या वजनी गटात अपयशच आले. त्यामुळे अंशुचे पदक आता उर्वरित मल्लांना प्रेरक ठरले. यामध्ये विनोद पुनिया राहुल आवारे आणि सत्यव्रत काडियन यांचा समावेश आहे.

महिलांच्या अंतिम लढतीत अंशुला विजेतेपदाची पसंती मिळत होती. मात्र, उपांत्य फेरीत वेरोनिक हिला पराभूत करताना दाखवलेला खेळ अंशु आज अंतिम लढतीत निचिता विरुद्ध दाखवू शकली नाही. पहिल्याच फेरीत निष्क्रिय कुस्तीसाठी ताकिद मिळविल्यावर ती गुण मिळवू शकली नाही. त्यामुळे निचिताला एक गुण बहाल करण्यात आला. त्यानंतर निचिताने आपला बचाव भक्कम ठेवताना अंशुला चुका करायल्या लावल्या आणि याचाच फायदा उठवत तिच्यावर ताबा मिळवत निचिताने गुणांची कमाई केली. दुसरीकडे अंशु बचावात्मक खेळाच्या प्रयत्नात प्रतिस्पर्धीवर पलटवार करण्यात अपयशी ठरली.