पालखी दरम्यान हातगाडी,स्टॉल बंद ठेवण्याचा निर्णय

0
231

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – श्री संत जगद्गुरु संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा 21 व 22 जून रोजी पिंपरी-चिंचवड शहरातून पंढरीकडे जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पालखीला भाविकांची होत असलेली प्रचंड गर्दी यातून अनुचित प्रकार घडू नये, लाखो भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पालखी मार्गावरील देहू ते पिंपरी चिंचवड पुणे मार्गे सासवड पर्यंत पथारी, हातगाडी, स्टॉलधारक आपला व्यवसाय बंद करून महापालिका व पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र हॉकर फेडरेशन व महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.

कामगार नेते काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष इरफान चौधरी ,राजू बिराजदार, अनिल बारवकर ,फरीद शेख ,पप्पू तेली, अंबालाल सुखवाल, रफिक गोलंदाज, देवीलाल आहेर, सागर बोराडे ,प्रशांत मारणे, नितीन भराटे, मनोज गुप्ता, सहदेव होनमाने,सोगिलाल पाटील आदीसह पुणे जिल्ह्यातील विक्रेते यावेळी उपस्थित होते.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून लाखो भाविक सहभागी होत असतात. आळंदी व देहूच्या दिशेने जाणारे व पालखी मार्गातून परत येणा-या भाविकांची गर्दी अनुचित प्रकार, चेंगराचेंगरी असे प्रकार होऊ नये म्हणून सुमारे पंधरा वर्षापासून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे व्यवसाय बंद ठेवून वारकऱ्यांची सेवा करण्यात येते. फेरीवाले विविध रूपाने वारकऱ्यांची सेवा करत असतात. यामध्ये मोफत चहा, नाश्ता देणे, चरण सेवा ,अल्पोपहार सेवा अशा विविध प्रकारच्या सेवा फेरीवाल्याकडून करण्यात येत आहेत. या बंदला फेरीवाल्यांनीपूर्वी पेक्षा अधिक सकारात्मक प्रतिसाद दिला असून हा उपक्रम वर्षानुवर्षे यशस्वीतेकडे जात आहे. बैठकीचे प्रास्ताविक सुशेन खरात यांनी केले. तर आभार हरी भोई यांनी मानले.