पार्थ पवार म्हणतात आपण काही घाबरणार नाही; आदित्य ठाकरे म्हणतात महायुतीचे ४८ उमेदवार निवडून येणार

0
1044

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि. ९) भरले. तत्पूर्वी बोलताना राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांनी लोकांनी माझ्यावर काय पण टिका करावी, आपण काही घाबरणार नसल्याचे सांगितले. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात महायुतीचे सर्व ४८ उमेदवार निवडून येणार असल्याचे सांगितले.

मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी (दि. ९) शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले. त्याआधी राष्ट्रवादीने चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डनपासून आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

राष्ट्रवादीच्या पदयात्रेला नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. या मतदारसंघात काय निकाल लागू शकतो, याची चुणूक या गर्दीमुळे पाहायला मिळाली. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजितदादा यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्यापूर्वी पदयात्रेत सहभागी नागरिकांना मार्गदर्शन केले. तपार्थ पवार यांनी आपल्या भाषणात माझ्या आयुष्यातील आज महत्त्वाचा दिवस असल्याचे म्हटले. निवडणुकीचा अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी कार्यकर्ते व जनतेचे आभार मानतो. आपल्याला ही सीट शंभर टक्के आणायची आहे. लोकांनी माझ्यावर काय पण टिका करावी. आपण काही घाबरणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आकुर्डीतील खंडोबा मंदिरापासून पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा काढली. बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. ते काय बोलतात याबाबत उत्सुकता होती. परंतु, आदित्य ठाकरे फार काही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.